भारताचा क्रमांक एकचा शत्रू आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला कराची, पाकिस्तान येथे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्याला कुणीतरी विष दिल्याचीही चर्चा आहे.सोशल मीडियावर याची चर्चा रंगलेली असून त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दाऊद गँगच्या एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले जात आहे की त्याला दाखल केले आहे आणि आजारी असल्यामुळे तिथे उपचार सुरू आहेत. ज्या मजल्यावर त्याला ठेवण्यात आले आहे तिथे कडेकोट बंदोबस्त आहे आणि काही मोजक्या लोकांव्यतिरिक्त कुणालाही प्रवेश नाही.
त्याच्यावर विषप्रयोग केल्याची चर्चा असली तरी त्याची अद्याप कुणी पुष्टी केलेली नाही. मुंबईत असलेल्या दाऊदच्या नातेवाईकांकडून अधिक माहिती मुंबई पोलीस घेत आहेत असे कळते. दाऊद ६५ वर्षांचा असून तो अनेक रोगांनी ग्रस्त असल्याच्या बातम्या यापूर्वीही आलेल्या आहेत. मुंबईत बॉम्बस्फोट केल्यानंतर तो फरार झाला होता आणि गेली अनेक वर्षे तो कराचीत आहे. पाकिस्तानातील वृत्तवाहिनी जियो टिव्हीनेही या चर्चेचा हवाला देत बातमी दिली आहे.