मुंबई, 26 जून : फॅसिस्ट, सत्तापिसाट आणि महाराष्ट्रद्रोही पिसाळांचे कारस्थान मोडून काढा, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी जनतेला केले आहे .
आपल्यापेक्षा वेगळा विचार असलेल्या पक्षांचे वा राजकीय विचारसरणीचे अस्तित्व फॅसिस्ट रास्व संघ आणि भारतीय जनता पक्षाला सहन होत नाही. एकाद्या राज्यात विरोधी पक्षाचे सरकार असेल तर ते काट्यासारखे त्यांच्या डोळ्यात खुपत राहते. ते सरकार उलथून टाकण्यासाठी हा पक्ष बाळगलेल्या भांडवलदारांनी पुरवलेला अमाप पैसा वापरून विरोधी पक्षातील आमदार विकत घेतो. त्यासोबतच केंद्र सरकारच्या ईडी, सीबीआय, एनसीबी आदी यंत्रणा भाजपने आपल्या खासगी मालकीच्या बनवल्या आहेत. त्यांचा वापर करून विरोधकांना विविध मार्गांनी छळणे, त्यांना खोट्या गुन्ह्याखाली तुरूंगात टाकणे हा या पक्षाचा छंद बनला आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्ष, संघराज्य प्रणालीवर चालणारी संविधानिक व्यवस्था रास्व संघ-भाजपला मान्य नाही. संविधानाची ही तिन्ही मूलभूत तत्त्वे राजरोसपणे नष्ट करण्याचा कार्यक्रम हा पक्ष राबवत आहे.
संपूर्ण देशाला चारदोन भांडवलदारांच्या दावणीला बांधून ते पुरवत असलेल्या बिदागीवर हा पक्ष देशावर राज्य करीत आहे. त्या बिदागीच्या थैल्या सैल सोडत लोकशाहीच्या मार्गाने सत्तेवर आलेली, विरोधी पक्षांची सरकारे पाडायचे कारस्थान सतत करत आहे. नैतिकतेच्या गप्पा करणाऱ्या भाजपने राजकीय नीतीमत्तेचे पार धिंडवडे काढले आहेत. हे आज महाराष्ट्रातही पदोपदी दिसत आहे.
भाजपचे हे मनसुबे पार पाडण्यासाठी त्यांनी राज्यातील घरभेदे शोधून काढले आहेत. त्यांना केंद्रीय यंत्रणांची दहशत दाखवत आपल्या मातृसंस्थेशी द्रोह करायला भाग पाडले आहे. घरभेदे मुळातच भ्याड असल्याने, रसदीतील हिस्सा आयताच मिळाल्याने सर्व नीतीमत्ता गुंडाळून ठेवून दिल्लीपतींना ते लाचारपणे शरण गेले आहेत. महाराष्ट्रात ते परत येताच त्यांचे पितळ उघडे पडणार आहे.
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या उद्दाम राज्यकर्त्यांपुढे, त्या पक्षाच्या एकाधिकारशाहीपुढे गुडघे टेकण्यास नकार दिला आहे. याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची राज्य कमिटी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत आहे. लोकशाही आणि संघराज्य प्रणालीच्या संरक्षणासाठी या कसोटीच्या क्षणी महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी आपली सर्व शक्ती उभी करण्याची ग्वाही माकप देत आहे.
एके काळी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची भाषा करणारे काहीजण शिवसेनेतून फुटून गेले असून त्यांच्यात आपल्या अनुयायांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या नजरेला नजर देण्याचे धाडस नाही. भाजप-शासित राज्ये गुजरात आणि महापूरग्रस्त असलेल्या आसाम मध्ये आश्रय घेऊन त्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवला आहे. त्यांनी केलेल्या महाराष्ट्र द्रोहाबद्दल मराठी माणूस त्यांना कदापि माफ करणार नाही.
भाजप करत असलेल्या कारस्थानामुळे महाराष्ट्रातील लोकशाही व्यवस्था, सामाजिक सौहार्द आणि प्रादेशिक संस्कृती धोक्यात आली आहे. त्यांचे संरक्षण करण्याची महाविकास आघाडी सरकारची जबाबदारी आहे.
थैलीशाही आणि केंद्रीय हुकूमशाहीच्या अभद्र युतीला दिलेल्या आव्हानातूनच महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे. त्यासाठी १०६ हुतात्म्यांनी रक्त सांडले आहे. मराठी मातीशी इमान राखणाऱ्याला इथला कामगार, शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक कधीच अंतर देणार नाही, हे ठासून सांगत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या कसोटीच्या प्रसंगी भाजपचे महाराष्ट्रद्रोही मनसुबे उधळून लावण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देत आहे. यासाठी जनतेला या कारस्थानामगील सत्य सांगण्यासाठी राज्यभर जोमदार मोहीम सुरू करण्याचा निर्णय पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीने घेतला आहे, अशी माहिती डॉ. उदय नारकर राज्य सचिव यांनी दिली आहे.