नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशातील संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. देशभरात दररोज हजारो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होतो आहे. हे मृतदेह जाळण्यासाठी स्मशानभूमीत रांगा लावाव्या लागत असल्याचे वृत्त समोर येत असतानाच आता नदी पात्रामध्ये शेकडो मृतदेह सापडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. या राज्यामध्ये कोरोना मृतांची आकडेवारी सरकारकडून लपवली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असतानाच गाजीपूर जिल्ह्यामध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने मृतदेह आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या मृतदेहांची विल्हेवाट नद्यांमध्ये लावण्यात येत असल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. बक्सर येथे गंगा नदीत अनेक कोरोनाग्रस्तांचे मृतदेह आढळले आहेत. तर कटीहार नदीत काही मृतदेह आढळले.
तसेच नदीमध्ये वाहून आलेल्या मृतदेहांचे लचके कुत्रे आणि इतर प्राणी तोडत असल्याचा भयंकर प्रकार समोर आल्याने व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.