Saturday, December 7, 2024
Homeराज्यमुस्लिम समाजाने आदर्श निर्माण केला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुस्लिम समाजाने आदर्श निर्माण केला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोल्हापूर (प्रतिनिधी) :- 

            कोरोनाच्या संकटकाळात पवित्र रमजान ईद दिवशी मुस्लिम समाजाने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता (आयसीयु) विभाग सुरु करण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. जात-पात, धर्म-भेद बाजूला ठेवून  कोरोनाच्या उच्चाटनासाठी एकजुटीने लढा देण्यासाठी इचलकरंजीतील हे योगदान आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काढले.

            इचलकरंजीमधील समस्त मुस्लिम समाजाच्या देणगीतून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सुरु अतिदक्षता विभागाचे मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन लोकार्पण केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित होते.

             कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्यावतीने केलेल्या आवाहनानुसार समस्त मुस्लिम समाजाने ईदमधील अनावश्यक खर्चाला फाटा देत रमजानच्या पवित्र महिन्यातील जकात, सदका आणि इमदादची रक्कम कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी दिली. या रकमेतून इंदिरा गांधी असामान्य रुग्णालयात १० बेडचा अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आला आहे. रमजान ईदचे औचित्य साधून याचे लोकापर्ण करण्यात आले.

            मुख्यमंत्री ठाकरे संवाद साधताना म्हणाले, इचलकरंजीतील मुस्लिम समाजाने याद्वारे एक मोठा आदर्श देशासमोर ठेवला आहे. आत्तापर्यंत आपण सर्वांनी मिळून कोरोनाला धैर्याने आणि संयमाने रोखून ठेवले आहे. इथून पुढे लोकसहभाग गरजेचा आहे. सण कसा साजरा करायचा याचे उत्तम उदाहरण मुस्लिम समाजाने सर्वांना दाखवून दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

            सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांनीही मुस्लिम समाजाच्या कार्याचे कौतुक करून रुग्णालय सर्वच सुविधांनी सुसज्ज करण्याचे आश्‍वासन दिले.

संबंधित लेख

लोकप्रिय