नाशिक(२६ मे) :-
अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने २७ मे रोजी कोरोना हाताळण्यात मोदी सरकारला आलेले अपयश, तसेच कोविड संकटाचा फायदा घेऊन मोदी सरकार शेतकऱ्यांवर करीत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ देशातील विविध शेतकरी संघटना २७ मे रोजी निषेध दिन पाळणार आहेत. शेतकर्यांच्या या आंदोलनाला महाराष्ट्र सीटूच्या वतीने पाठिंबा देणारे प्रसिद्धीपत्रक सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी एल कराड व राज्य सरचिटणीस एम.एच.शेख यांनी काढले आहे.
कोरोना संकटाचा मुकाबला करण्यात मोदी सरकारला संपूर्ण अपयश आले आहे. या काळामध्ये कामगार, गोरगरीब, कष्टकऱ्यांची उपासमार झाली. स्थलांतरित कामगारांची प्रचंड हाल झाले. मोदी सरकारने जाहीर केलेले २० लाखांचे पॅकेज हे संपूर्णपणे फसवेगिरी आहे असे स्पष्ट झाले . संकटाच्या काळात मोदी सरकारने कामगारांच्या वेतनात कपात, महागाईभत्ता कपात करणे, कामगार कायदे स्थगीत करणे असे अनेक कामगार विरोधी निर्णय घेऊन कामगारांच्या जगण्यावर व कायदेशीर हक्कांवर घाला घातला . त्याच पद्धतीने या संकटाचा फायदा घेऊन मोदी सरकार शेतकर्यांवर सुद्धा हल्ला करीत आहे.
शेतकऱ्यांना कोविड काळामध्ये फारशी मदत सरकारने केलेली नाही. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण मजूर संकटात आहेत. तसेच शेतकऱ्यांची जमीन कार्पोरेटला हडपता यावी यासाठी मदत करणारे निर्णय घेतले आहेत. या हल्ल्याच्या विरोधात व शेतकरी वर्गाच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटना २७ मे रोजी शारीरिक अंतर ठेवून रस्त्यावर उतरणार आहेत. त्याला सिटूचा जाहीर पाठिंबा देत आहे. सिटूच्या कार्यकर्त्यांनी सक्रियपणे या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.