मुंबई (प्रतिनिधी):-
विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीचे त्वरित वितरण करा अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेने दिले आहे. यासंबंधीचे निवेदन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना पाठवण्यात आले आहे.
सध्या जगभरासह देशात आणि राज्यात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन आहे. यामुळे राज्यातील जनतेला भयंकर परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. या महामारीने अनेक बळी घेतले. लाखो कुटुंबांचे हातातले काम हिरावून घेतले. शेतकरी, शेतमजूर, कामगार व समाजातील अशाच प्रकारची कामे करून आपले कुटुंब चालवणाऱ्यांवर आज अधिकच संकट कोसळले आहे. म्हणून या महामारीने हाहाकार माजवला आहे. याने सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे.
विद्यार्थ्यांवर देखील या महामारीचा वाईट असा परिमाण झालेला आहे. शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी राज्यात, देशात आणि परदेशात अडकून पडले आहेत. काही विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोच करण्यात आलेले आहे. परंतु अजूनही बरेच विद्यार्थी अशाच अडचणीत आहेत. लॉकडाऊनमुळे यंदा थोडे लवकरच शैक्षणिक वर्ष २०१९-२० हे साल संपले आहे. आतापर्यंत राज्यातील सर्वच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळणे अपेक्षित होते. परंतु आजपर्यंत देखील राज्यातील हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. शैक्षणिक वर्षाच्या शेवटपर्यंत शिष्यवृत्ती न मिळणे, ही खूपच निंदाजनक बाब आहे. इतर कर्तव्ये पार पडताना सरकारने शिष्यवृत्ती वितरीत करण्याच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करणे गंभीर असल्याचे एसएफआय ने म्हटले आहे
येत्या ३१ मे पर्यंत राज्यातील सर्व अभ्यासक्रमाच्या व सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे त्वरित वितरण करावे. अन्यथा १ जूनपासून राज्यभरात एसएफआय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी शासन जबाबदार राहील असे एसफआयचे राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड आणि राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी सांगितले आहे.