रत्नागिरी : आरक्षण हक्क कृती समिती मार्फत आयोजित 26 जून 2021 रोजीच्या आक्रोश मोर्चाला बिरसा फायटर्सचा पाठिंबा असून मोर्चात बिरसा फायटर्स सहभागी होणार असल्याची माहिती बिरसा फायटर्सचे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे. याबाबत राज्य निमंत्रक आरक्षण हक्क कृती समिती महाराष्ट्र यांना सुशीलकुमार पावरा यांनी बिरसा फायटर्सचे पत्र पाठवले आहे.
पत्रात कळवले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या संविधान विरोधी धोरणाविरोधात आरक्षण हक्क कृती समितीच्या 26 जून 2021 रोजी मुंबई येथे होणा-या आक्रोश मोर्चाला बिरसा फायटर्सचा पाठिंबा असून मोर्चात बिरसा फायटर्स संघटना सहभागी होणार आहे.
संवैधानिक हक्क व आरक्षण संपविण्याच्या षडयंत्र विरूद्ध अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमूक्त जमाती, विशेष मागास वर्ग आणि ओबीसी समाजाचे हे जनआंदोलन असून 80 पेक्षा अधिक मागास वर्गीय संघटना या मोर्चात शामिल होणार आहेत. दिनांक 26 जून 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता आझाद मैदान मुंबई येथून या आक्रोश मोर्च्याला सुरवात होणार आहे.
पदोन्नतीतील आरक्षण बंद, शिष्यवृत्ती फ्रीशीप बंद, खाजगीकरण, कंत्राटीकरण, कामगार हिताचे 44 कायदे रद्द, नवीन शैक्षणिक धोरणात आरक्षण बंद, ओबीसींना पदोन्नतीत व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षण, शेतकरी विरोधी कायदे, अन्याय अत्याचारमध्ये वाढ, कोरोना काळात मोफत रेशन, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी, बारा बलुतेदारांना आर्थिक सहाय्य इत्यादी विषयांवर हा आक्रोश मोर्चा आहे.