मुंबई : भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू सुरेश रैनाने (Suresh Raina) आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतलाय. सुरेश रैनाने संपुर्ण क्रिकेटला पूर्णपणे अलविदा केला आहे. सुरेश रैनाने या संदर्भातील माहिती ट्वीटकरून दिली आहे.
सुरेश रैनाने ट्वीट करत म्हटले आहे की, ‘देश आणि उत्तर प्रदेश राज्यासाठी क्रिकेट खेळणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. तसेच मी बीसीसीआय, यूपी क्रिकेट असोसिएशन, आयपीएल टीम सीएसके आणि राजीव शुक्ला यांचे आभार मानतो. मला पाठिंबा दिल्याबद्दल मी चाहत्यांचेही आभार मानतो. असेही भावनिक ट्विट रैनाने केले आहे.
याबाबत सुरेश रैनाने उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन (UPCA) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) कळवलं असल्याची माहिती समोर येत आहे. सुरेश रैनाने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश संघ आणि आयपीएलमध्ये खेळताना दिसला. आता तो फक्त परदेशी लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.
दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, सुरेश रैना येत्या 10 सप्टेंबरपासून रोड सेफ्टी सीरिजमध्ये खेळणार आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, यूएई येथील लीगनंही संपर्क साधला आहे.