बीजिंग : चीनमध्ये निसर्गाचा कहर सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत चीनमध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. सांगितले जात आहे की हा पाऊस गेल्या 1000 वर्षातील सर्वात भयानक पाऊस आहे व यामुळे चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. अनेक चिनी राज्ये या भीषण पावसाला बळी पडली आहे.
चीनच्या मध्यवर्ती हेनान प्रांतात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभुमीवर अध्यक्ष शी जिनपिंग यांना बुधवारी ‘सबवे’, हॉटेल आणि सार्वजनिक ठिकाणी अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी सैन्य तैनात करावे लागले.
आतापर्यंत, चीन सरकारने केवळ 25 मृत्यूची पुष्टी केली आहे, परंतु असा अंदाज व्यक्त केला जात आहे की चीनमध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे व सरकार अचूक आकडेवारी जाहीर करीत नाही. चीनच्या मध्यवर्ती हेनान प्रांताची राजधानी झेंगझोऊ येथे मेट्रो मार्गावर पुराच्या पाण्यात डझनहून अधिक लोक ठार झाले आहेत. झेंगझोऊ शहरात मुसळधार पावसामुळे सुमारे 2 लाखाहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. वृत्तानुसार, संपूर्ण शहर पुराच्या पाण्याखाली आहे.
हेनानच्या प्रांतीय हवामान खात्याने सांगितले की, प्रांतीय राजधानी झेंगझो येथे मंगळवारी 24 तासांत सरासरी 457.5 मिमी पाऊस पडला आहे. हवामान खात्याच्या नोंदी ठेवण्यात आल्यापासून एकाच दिवसातील हा सर्वाधिक पाऊस आहे. दरम्यान, हॉंगकॉंगच्या सिटी युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर जॉनी चॅन म्हणाले की, अमेरिका आणि कॅनडामधील उष्णता आणि युरोपमधील भीषण पूरानंतर आता चीनमधील मुसळधार पाऊस हा घटना ग्लोबल वार्मिंगशी जोडलेल्या आहेत.