पुणे, दि. १८ : आशा व गटप्रवर्तक कृती समिती संपावर ठाम असल्याचे समजते. आज सायंकाळी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे सुत्रांकडून समजते. त्यामुळे संप मिटविण्यासाठी खा. शरद पवार यांनी केलेली मध्यस्थी निष्फळ ठरली आहे.
कोरोना महामारीच्या कठीण काळात हा संप लवकरात लवकर मिटावा यासाठी महाराष्ट्र राज्य आशा – गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीचे अध्यक्ष एम.ए.पाटील यांची खा. शरद पवार यांनी आज भेट घेतली.
माफक किमान वेतन आणि कोरोना काळातील कामाचा योग्य भत्ता मिळावा या मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांनी बेमुदत संप पुकारला आहे.
खा. पवार यांनी एम. ए. पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांचे म्हणणे जाणून घेतले. यासंदर्भात महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून वेतनवाढीबाबत समाधानकारक तोडगा काढण्यास त्यांना सुचविले, असल्याचेही पवार म्हणाले.
परंतु आज ( दि. १८) सायंकाळी गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीची बैठक संपन्न झाल्याचे सुत्रांकडून समजते. या बैठकीमध्ये आशा व गटप्रवर्तकांचा संप चालू ठेवण्यावर शिकामोर्तब झाले आहे. किमान वेतनाबाबत जो पर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत संप चालूच राहणार आहे.