तब्बल 6 लाख विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन परीक्षा घ्यायचा घाट घातलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा नमुना समोर आला आहे. विद्यापीठातील परीक्षेसाठी 10 दिवस उरले असतानाही अजूनही विद्यार्थ्यांना वेळापत्रक देण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्या पालक आणि विद्यार्थ्यांवरील तणाव वाढला आहे.
पुणे विद्यापीठातील सत्र परीक्षेला अवघे 10 दिवस शिल्लक राहिले आहेत. तरी अजून विद्यापीठ प्रशासाने सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या नियोजनात अडचणी येत आहेत.
आता 11 एप्रिलपासून सत्र परीक्षेला सुरुवात होईल. कोरोनाच्या संकटानंतर ही विद्यापीठातील पहिलीच सत्र परीक्षा आहे. तब्बल 6 लाख विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा देणार आहेत. मात्र, वेळापत्रक देण्यातील दिरंगाई पाहता प्रत्यक्ष परीक्षा सुरु झाल्यावर आणखी गोंधळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्यावर्षी मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेवेळीही असाच गोंधळ उडाला होता. परीक्षा सुरु झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाली नव्हती. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाबाहेर आंदोलन केले होते.