पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या, निकालांनी काही आश्चर्याचे धक्के दिले. भगतसिंग आणि आंबेडकर यांच्या नावावर आप ने पंजाबची निवडणूक लढवली आणि जिंकली. ही एक आशादायक गोष्ट आहे.
निवडून आल्या आल्या भगवंत मान यांनी प्रत्येक सरकारी कार्यालयात भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र लावण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी केली, ही त्यातल्या त्यात सकारात्मक बाब आहे.
एका बाजूला जातीय धार्मिक राजकारणाने उच्छाद मांडलेला असतांना ” मी नास्तिक का आहे ?” याची शास्त्रशुद्ध मांडणी करणारे भगतसिंग आणि धर्मनिरपेक्षतेचं मूल्य रुजवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनतेच्या मनाची पकड घेतात आणि निवडणुकांचे सर्व प्रस्थापित निकष तोडत निकाल बदलून टाकतात, ही नव्या राजकारणाची रुजुवात आहे.
भगतसिंगांचे वारस असलेल्या कम्युनिस्टांना आजवर त्यांच्या नावाने जे राजकारण शक्य झाले नाही ते आप ने करून दाखवले. हे एकूणच डाव्या राजकारणाच्या डोळ्यात अंजन घालणारं आहे. परंतु हिंदुस्तान सोशियालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सभासद आणि कम्युनिस्ट विचारांनी स्वातंत्र्य लढ्याची धुरा सांभाळणाऱ्या भगतसिंगांना आदर्श मानून तुम्ही तुमच्या राजकारणाची आखणी करणार असाल तर तुम्हाला केवळ त्यांचे फोटो लावून चालणार नाही.
कारण भगतसिंगांनी मांडणी केल्याप्रमाणे, देशात फक्त सत्तांतर होऊन काहीही भलं होणार नाही. तर जोवर कामगार शेतकऱ्यांच्या हाती सत्तेचे सूत्र येत नाही , तोवर सामान्य माणसाच्या आयुष्यात काहीही बदल होणार नाही. ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेले हे सत्तांतर त्याचीच ग्वाही देवून जाते.
भगतसिंगांनी सत्ताबदलासाठी व्यावसायिक क्रांतिकारकांच्या भूमिकेसोबतच प्रत्येक नागरिकांत स्वतंत्रविचारसरणी आणि” का ? “विचारण्याची क्षमता विकसित होणं हे समाज विकासाचं लक्षण मानलं आहे. ते सर्वप्रकारच्या कट्टरते विरुद्ध होते. तेव्हा त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्या प्रत्येकाला हे ध्येय गाठावे लागणार आहे.
आज 23 मार्च, 91 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी हौतात्म्य स्वीकारलं. आज भारतीय राजकारणात तसं म्हटलं तर, भगतसिंग पुन्हा नव्याने मुख्य राजकिय प्रवाहात जोरदारपणे धडकले आहेत. ही यानिमित्ताने त्यांना वाहिलेली आदरांजलीचीच आहे.
परंतू भगतसिंग एक असा विचारांचा प्रवाह आहे, जो सोबत असल्यास तुम्हाला सोबत घेऊन चालेल पण त्याची प्रतारणा केल्यास तो तुम्हाला प्रवाहाबाहेर फेकल्याशिवाय रहाणार नाही. याची जाणीव प्रत्येकक्षणी ठेवावी लागेल.
डॉ. समीर अहिरे ,
नाशिक.