Thursday, February 6, 2025

बीड : एसएफआयचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

प्रतिकात्मक वर्ग भरवून केल्या शैक्षणिक मागण्या

बीड (ता.१२) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या वतीने गुरुवारी १२ ऑगस्ट रोजी विविध शैक्षणिक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालायासमोर आंदोलन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क माफ करा. कोविडचे नियम पाळून सर्व शैक्षणिक संस्था सुरु करा आणि इतर महत्त्वाच्या शैक्षणिक मागण्यांसाठी एसएफआयने हे आंदोलन केले. आंदोलनात प्रतिकात्मक शिकवणी वर्ग भरवून एसएफआयने शैक्षणिक मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सरकारला दिले.

१२ ऑगस्ट हा भारतीय इतिहासातील महत्त्वपूर्ण दिवस आहे. याच दिवशी १९३६ साली भारतातील पहिल्या संघटीत विद्यार्थी चळवळीची सुरुवात झाली होती. त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून १२ ऑगस्टच्या निमित्ताने विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी देशभरात रस्त्यावर उतरले होते.

कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षांपासून राज्यातील सर्वच जनता त्रस्त आहे. या महामारीचा अत्यंत वाईट असा परिणामत्याक्षण क्षेत्राला भोगावे लागले; अद्यापही भोगावे लागत आहे. मागील वर्षी सर्व विद्यार्थ्यांना एका सेमिस्टरमध्ये सवलत देऊन पास करण्यात आले. परंतु पुढील वर्षात त्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाहीत. म्हणजेच विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकले गेले आहेत. त्यामध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. महामारीत पर्याय म्हणून ऑनलाईन शिकवणी वर्ग चालू करण्यात आले. परंतु त्यात सर्वच विद्यार्थी सामावून घेतले गेले नाहीत. नेटवर्क समस्या, ग्रामीण-दुर्गम भागातील मुलभूत सोई-सुविधांचा अभाव, मोबाईल खरेदी व रिचार्जसाठी पालकांकडे पैसे नसणे, विद्यार्थ्याची स्क्रीनसमोर बसण्याची मर्यादा आदी प्रकारचे अडथळे समोर आले. त्यामध्ये राज्य सरकारकडून कोणतेही प्रभावी असे कार्य झालेले नाही. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात सामावून घेणे ही सरकारची जबाबदारी आहे, पण सरकार ते करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे एसएफआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

एसएफआयच्या वतीने आज १२ ऑगस्ट रोजी राज्यभरातील विविध जिल्ह्यांत कोविडचे नियम पाळत आंदोलन, निदर्शने, प्रतिकात्मक शिकवणी वर्ग भरवून आंदोलन केले आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झाले. यावेळी एसएफआय प्रतिकात्मक शिकवणी वर्ग भरवून आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनास दिले.

एसएफआयने पुढील मागण्या केल्या

१) मागील व चालू वर्षाचे सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क माफ करा.

२) कोविडचे नियम पाळून सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व इतर शैक्षणिक संस्था सुरु करून विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची सोय उपलब्ध करा. डिजिटल विभाजन थांबवा. 

३) विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती, फेलोशीप, स्वाधार योजनेची रक्कम त्वरित वितरीत करा.

४) १०/१२वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रवेशाची व्यवस्था करा. 

५) एमपीएससीच्या रखडलेल्या नियुक्त्या व भरती प्रकिया त्वरित पूर्ण करा. सरकारी विभागातील सर्व नोकरभरती एमपीएससी मार्फत करा. 

६) दिल्लीत ९ वर्षीय मुलीवर अत्याचार करून ठार मारले गेले, या घटनेचा एसएफआय तीव्र निषेध करते आणि महिला अत्याचार प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा करण्याची मागणी करते. जिल्ह्यातही अनेक महिला अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. अशा घटनांना कायमचा आळा घालण्यात यावा. 

७) विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांचे लसीकरण वेगाने करा. 

८) ऊसतोडणी कामगारांच्या पाल्यांसाठी घोषित वसतिगृहे त्वरित सुरु करा. 

९) राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रिया त्वरित राबवा. 

१०) नियमबाह्य शुल्क आकारणाऱ्या शाळा, महाविद्यालयांवर कठोर कारवाई करा. 

या आंदोलनात एसएफआयचे महाराष्ट्र राज्य सचिव रोहिदास जाधव, जिल्हा अध्यक्ष सुहास झोडगे, जिल्हा सचिव लहू खारगे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव, डीवायएफआयचे तालुका अध्यक्ष सुहास जायभाये, प्रा. कुंडलिक खेत्री, अभिषेक शिंदे, ज्योतिराम कलेढोण,  शंकर चव्हाण, निखील शिंदे, नितीन जाधव, मंगेश मुंडे, ए. कांबळे, नितीन झोडगे, जुनेद शेख, गणेश कोकणे, संतोष खंदारे, वैजनाथ सानप, सुरेश जाधव, राहुल राठोड, संघर्ष जायभाये, आदी सहभागी झाले होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles