बीड (ता.८) : गाळपाविना जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याचा ऊस शेतात शिल्लक राहू नये यासाठी जिल्ह्यातील सर्वच कारखाने तात्काळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभा बीड जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे आज करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात किसान सभेने म्हटले आहे की, जिल्ह्यात मागील वर्षापेक्षा यावर्षी ऊस या पिकाखालील क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे. चालू हंगामासाठी साखर आयुक्तांनी ऊस गाळपास परवानगी दिलेल्या कारखान्यांकडून जिल्ह्यातील सर्व उपलब्ध उसाचे गाळप होईल की नाही? याबद्दल शाश्वती नाही. अशातच मागच्या हंगामात सुरू असणाऱ्या काही कारखान्यांना यावर्षी गाळपाची परवानगीबाबत संदिग्धता दिसून येत आहे. यामुळे या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील बऱ्याच प्रमाणात ऊस गाळपाविना शेतातच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच जिल्ह्याबाहेरील कारखान्यांनाही आपापल्या कार्यक्षेत्रात मुबलक ऊस उपलब्ध झाला असल्याने ते यावर्षी आपल्या जिल्ह्यातील उसाचे गाळप करण्यासाठी येणार नाही. अशा स्थितीत जिल्ह्यातील ऊस मोठ्या प्रमाणात शिल्लक राहून शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागतील की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील साखर कारखाने पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर सुरू करून उसाचे गाळप करण्यात यावे. तसेच ऊस गाळपासाठी सक्षम असणाऱ्या पण ऊस गाळपाची परवानगी मिळू न शकलेल्या कारखाने सुरू करण्यासंदर्भात शासनाने विशेष लक्ष घालून कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप करून शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे विहित वेळेत हमी भाव देण्याची व्यवस्था करावी. एकाही शेतकऱ्याचा ऊस गाळपाविना शेतात शिल्लक राहणार नाही. याची शासनाने काळजी घ्यावी अन्यथा जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न स्फोटक बनून परिस्थिती चिघळू शकते. म्हणून आमच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन वेळेत कार्यवाही व्हावी, असे किसान सभेने निवेदनात म्हटले आहे.
अखिल भारतीय किसान सभेने आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरचे निवेदन सादर केले. हा प्रश्न जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा असून साखर कारखाने वेळेत सुरू झाले नाही तर हजारो शेतकरी हे अडचणीच्या खाईत लोटले जातील. प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होईल. म्हणून साखर आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने कोणत्याही परिस्थितीत पूर्ववत सुरू केले पाहिजेत. अन्यथा अखिल भारतीय किसान सभा बीड जिल्हा कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा ऊस गाळपाविना राहिला तर त्यास प्रशासन आणि कारखाना जबाबदार राहील. याची दखल प्रशासनाने घ्यावी, असे किसान सभेने म्हटले आहे.
यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ. मुरलीधर नागरगोजे, किसान सभेचे ज्येष्ठ नेते कॉ. पांडुरंग राठोड, जिल्हा उपाध्यक्ष कॉ. अजय बुरांडे, जिल्हा अध्यक्ष कॉ. मोहन लांब, रोहिदास जाधव, ओम पुरी, गणेश अंबुरे, शंकर चव्हाण, आदींची उपस्थिती होते.