३० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने
परळी वै. / अशोक शेरकर : २०२० चा पिक विमा विना अटी शर्तीसह मंजुर करावा, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा शुक्रवारी (ता.३०) बीड च्या जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात येणार अाहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठया संख्येनी सहभागी होण्याचे आवाहन कॉ. अड. अजय बुरांडे यांनी पिक विमा परिषदेत केले.
परळी येथे मंगळवारी (ता.२७) किसान सभेच्या वतीने २०२० पिक विमा परिषदेचे आयोजी करण्यात आले होते त्यावेळी कॉ. अड. बुरांडे बोलत होते. यावेळी माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. पी एस घाडगे, शेतमजुर युनियनचे कॉ. दत्ता डाके, कॉ. पांडुरंग राठोड, सिटु चे जिल्हाध्यक्ष कॉ. बी जी खाडे यांनी परिषदेत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. मोहन लांब होते. यावेळी पुढे बोलताना कॉ. बुरांडे म्हणाले की महसुल विभागाने पंचनामे करूण नुकसान भरपाई दिलेली आहेत. शासनाचा नुकसानीचा आलेला अहवाल ग्राह्य धरूण अग्रीकल्चरल ईन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांचा २०२० चा पिक विमा मंजुर केला पाहीजे. याच मागणीसाठी शुक्रवारी (ता.३०) बीड च्या जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांना २०२० पिक विमा मिळणार नाही तोपर्यंत वेगवेगळया स्तरावर आंदोलन करण्यात येणार आहेत. या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन कॉ. अजय बुरांडे यांनी पिक विमा परिषदेत केले.
सुरूवातीला कृषी उत्पन्न बाजार समिती पासुन भव्य रेली काढण्यात आली. पिको विमा कंपनी व शासनाच्या निषेधाच्या गगनभेदी घोषणा व शेतकऱ्यांच्या हातातील लाल झेंडे शहरवासीयांचे लक्ष वेधुन घेत होते. परिषदेत सुदाम शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी क्रांतीकारी गीते गायली. परिषदेस जिल्हाभरातील शेतकरी मोठया संख्येनी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ. मुरलीधर नागरगोजे यांनी केले. संचलन बालासाहेब कडभाने यांनी तर आभार विशाल देशमुख यांनी मानले.