Saturday, October 5, 2024
Homeशिक्षणआनंदी रहा व इतरांना आनंद द्या - डॉ. संजय कळमकर

आनंदी रहा व इतरांना आनंद द्या – डॉ. संजय कळमकर

हडपसर / डॉ. अतुल चौरे : सध्याचा काळ हा ऑनलाईन आहे. आभासी विश्व अवास्तव आहे. या आभासी जगात नात्यांचे विच्छेदन होत आहे. माणसाने वास्तवाला सामोरे गेले पाहिजे. आजच्या युवकांनी कौशल्य आत्मसात करून यशस्वी व्हावे. पुस्तकाच्या वाचनाने आपले मन प्रगल्भ होते. युवकांनी आपल्या आई-वडिलांनी केलेला त्याग समजून घ्यावा. जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणजे आईच असते. आपल्याला कला येत नसेल तर इतरांच्या कलांचे कौतुक करा. आनंदी रहा आणि इतरांना आनंद द्या. अध्यापकांनीही प्रभावी अध्यापन होण्यासाठी वाचन, लेखन करावे. वाचन, लेखन  केले तर सुखाबरोबर समाधानही मिळेल. असे विचार सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी व्यक्त केले. 

ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कर्मवीर व्याख्यानमालेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे व प्राचार्य विजय शितोळे यांनी केला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे, पश्चिम विभागीय सहाय्यक अधिकारी एस. टी. पवार होते. ते म्हणाले  की,  व्याख्यानमाला हा विचारांचा उत्सव असतो. सुंदर विचारांची व मूल्यांची पूजा करू या. सकारात्मक दृष्टीने जीवनाकडे पाहिले तरच मनात सुंदर विचार येतील. सुंदर विचार आपल्याला सुंदर बनवतील, असे ते म्हणाले.

सूत्रसंचालन डॉ. शिल्पा शितोळे यांनी केले. तर आभार डॉ.राजेंद्र ठाकरे यांनी मानले. या व्याख्यानमालेला साधना शैक्षणिक संकुलाचे सर्व शाखाप्रमुख, प्राचार्य सुजाता कालेकर,  मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर, प्राचार्य रोहिणी सुशीर, मुख्याध्यापिका झीनत सय्यद, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक ऑनलाईन उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन मराठी विभागाने केले.


संबंधित लेख

लोकप्रिय