Wednesday, April 24, 2024
Homeजुन्नरखरीपाचे बियाणे खरेदी करताना दक्ष रहा; फसवणूक वाढतेय – महाराष्ट्र राज्य कांदा...

खरीपाचे बियाणे खरेदी करताना दक्ष रहा; फसवणूक वाढतेय – महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे आवाहन

जुन्नर : मान्सूनचे आगमन जरी लांबणीवर पडले असले तरीही खते-औषधे व बी- बियाणांची दुकाने विविध प्रकारच्या कंपन्यांच्या मालांनी सजली आहेत. अनेक प्रकारचे नवनवीन वाणं बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. गेली काही वर्षे शेतकर्यांची बियाणांमध्ये मोठया प्रमाणात फसवणूकीचे प्रकार होत असून शेतकर्यांनी बीयाणे खरेदी करताना सावधगिरी बाळगावी असे अवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पानसरे यांनी केले आहे.

कोसळलेल्या शेतमालाच्या बाजारभावांमुळे गेली काही वर्षे शेतकरी सातत्याने आर्थिक संकटात सापडला जात आहे. शेतमालाला योग्य बाजारभाव मिळो अथवा न मिळो पण दिवसेंदिवस शेती साठी लागणारी बी- बियाणे, खते- औषधे यांच्या किंमती मात्र वाढतच चालल्या आहेत. यात लिंकींगच्या नावाखाली आणखीनच शेतकर्यांची लुटमार दुकानदार आणि कंपन्यांकडून होत आहे. बीयाणे अथवा खते खरेदी करताना अनेकदा अनावश्यक प्रॉडक्ट शेतकर्यांच्या माथी मारले जात आहे. अशा प्रकारे कोणीही अडवणूक करत असेल तर तातडीने अशा दुकानदारांची तक्रार तालुका किंवा जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे करण्यात यावी. तसेच याबाबत शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. असे अवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

बीयाणे खरेदी करतानाची दक्षता

बीयाणे व खते शासकीय परवानाधारक दुकानदारांकडूनच खरेदी करावी. कंपनी पॅकेजचे बीयाणे घ्यावे, सुट्टे बीयाणे खरेदी करू नये भेसळ असण्याची शक्यता असते. बीयाणे खरेदी करताना दुकानदारांकडून पक्के जीएसटी बील नंबरसह घ्यावे. त्यावर संबंधित बीयाणे कंपनीचे नाव, बियाणे उत्पादनाचे वर्ष, बियाणाची जात, उगवन क्षमता, छापील किंमत, पिशवी शिलाई कंपनी सिल ( टॅग ), दुकानदाराची व खरेदीदाराची सही आदी विविध प्रकारच्या बाबी तपासून पहाव्यात. कितीही जवळचा मित्र किंवा नातेवाईक दुकानदार असला तरीही पक्के बील वरील सर्व दक्षतांसह घ्यावे. तसेच दुकानदार अथवा कंपन्यांनी शिफारस करण्यापेक्षा स्वतःचा अनुभव किंवा कृषी अधिकार्यांनी शिफारस केलेल्या वाणाला प्राधान्य द्यावे.

पेरणी करताना जमिनीत बीयाणे उगवण्यासाठी पुरेशी ओल असणे गरजेचे आहे. पेरणीची घाई करू नये. बियाणाची पिशवी फोडताना शिलाईमध्ये अडकवलेला टॅग तसाच ठेवण्यासाठी पिशवीला खालच्या बाजूने छिद्र पाडून बीयाणे घ्यावे. थोडेसे बीयाणे राखून ठेवावे. खरेदीचे पक्के बील आणि बीयाणे पॅकिंग पिशवी टॅगसह जपून ठेवावी. तसेच दोन वेगवेगळ्या वाणांचे बियाणे एकत्र करून पेरणी करू नये. भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास ह्या बाबी महत्त्वाच्या आहेत.

खरीप हंगामासाठी बाजारात बियाणांचा आणि खतांचा पुरेसा प्रमाणात साठा उपलब्ध करून दिल्याचे शासनाने जाहीर केलेले आहे. त्यामुळे कोणीही कोणत्या ठराविक कंपनीच्या अथवा जातीच्या बीयाणासाठी किंवा खतांसाठी सक्ती करत असेल. तसेच लिंकींग साठी जबरदस्ती करत असेल तर तातडीने संबंधित दुकानदाराची तक्रार कृषी अधिकार्यांकडे करण्यात यावी. पेरणी केलेल्या बीयाणाच्या उगवन क्षमतेकडे बारकाईने लक्ष द्यावे. यासंदर्भात कोणतीही शंका निर्माण झाल्यास तातडीने संबंधित दुकानदाराशी संपर्क साधावा आणि तक्रार दाखल करावी. तसेच पेरणी करताना बीयाणे पॅकिंग पिशवी फाडतानाचे फोटो काढून ठेवावेत. पेरणीचे फोटो तसेच बी उगवल्याचे फोटो मोबाईल मध्ये काढून ठेवावेत. भविष्यात गरज पडल्यास याचा उपयोग होऊ शकतो.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय