मोडी लिपीतील दोन अप्रकाशित महजर आढळले (Baramati)
बारामती / वर्षा चव्हाण – कसबे बारामती येथील पाटीलकी वतनासंबंध तत्कालीन ढवाण व कोंडे या दोन कुटुंबात सध्या तीनशे वर्षापूर्वी वाद उत्पन्न झाला होता. त्या वादासंदर्भात सलिले मोडीलिपीत असलेले दोन ऐतिहासिक न्यायनिवाडे प्रकाशात आले असून त्याचे भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे आणि बारामतीच्या श्री काशीविश्वेश्वर मंदिरात वाचन झाले आहे. (Baramati)
माळेगाव बुः येथील मोडीलिपी अभ्यासक ओंकार उदय चावरे यांनी संशोधन करून बारामतीच्या पाटीलकी संबंधाने इ.स. १७१४ आणि इ.स. १७२३ साली झालेले दोन अप्रकाशित निवाडे उजेडात आणले. यापैकी एक महजर पुणे पुराभिलेखागार येथे मिळाला असून दुसरा महजर हा बारामती येथील श्री. रोहन ढवाण पाटील यांच्या खाजगी संग्रहात आढळून आला
अॅड. ओंकार चावरे यांनी सांगितले कि, कसबे बारामती हे तत्कालीन सुपे परगण्यातील एक महत्वाचे ठाणे होते. शिवकाळात पाटीलकी वतन हे अत्यंत प्रतिष्ठेचे मानली जात असे. त्यामुळे पाटीलकी संबंधाने इतिहासात अनेक वाद होत असून त्याचे निवाडे झालेले आढळतात.
असाच वाद जावजी वलद मेंगोजी ढवाण आणि भागोजी वलद कानुजी कोंडे यांच्यात झाला होता. तेव्हा कोंडे यांनी. १६९२ साली सर्वप्रथम बारामतीचा तत्कालीन मोगल ठाणेदार असलेल्या यासीनखान याच्याकडे, बारामतीची पाटीलकी आमची असून ती आम्हास मिळावी अशी तकार केली. त्यावेळी पहिला निवाडा होऊन त्याचा ढवाण यांच्या बाजूने निकाल झाला होता.
त्यानंतर इ.स. १७१४ माली म्हणजे रंभाजीराजे निंबाळकर हे बारामतीचे जहागीरदार असताना पुन्हा कोंडे यांनी हि तक्रार केली. तेव्हा न्यायसभा भरून गोतांनी व पंचांनी ढवाण व कोंडे या दोघांकडील कागदपत्रे पाहिली व आजूबाजूच्या सर्व गावच्या मोकदम व बलुतेदार यांच्या साक्षी घेतल्या. तेव्हाही खरे पाटील असल्याने सिद्ध होऊन ढवाण महजर करून दिला. त्यानंतर बारामती ठाणे हे स्वराज्यात आल्यानंतर नरो प्रल्हाद छंदोगामात्य यांचेकडे पुन्हा कोंडे यांनी हीच तक्रार केली. (Baramati)
तेव्हा इ.स. १७२३ माली चिमणाजीपंत माणकेश्वर धायगुडे या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत श्री काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसरात याच्या न्याय निवाड्याचे कामकाज चालले तेव्हा सर्व कागद व मागचे निवाडे तपासून पंतांच्या आज्ञेवरून ढवाण व कोंडे या दोघास शपथ देऊन ब्रह्मकमंडलू नदीच्या म्हणजे कऱ्हेच्या तीर्थातून स्रान करवून देवाच्या गाभाऱ्यात घातले. तसेच उपस्थित गोत, मोकदम व बलुतेदार यांच्याही मस्तकावर तीर्थातील पाणी शिंपडून “जावजी ढवाण व भागोजी कोंडे यापैकी बारामतीची पाटीलकी खरी कोणाची असेल त्यास हाती धरून बाहेर घेऊन येणेची आज्ञा दिली. तेव्हा समस्त गोत, मोकदम व बलुतेदार यांनी जावजी ढवाण यास हाती धरून बाहेर घेऊन येऊन देशमुख देशपांडे यांच्या हाती दिले.
अशाप्रकारे कसबे बारामतीची पाटीलकी हि ढवाण यांची असल्याचे सिद्ध होऊन त्यांना दि. १३ डिसेंबर १७२३ रोजी हा महजर करून दिला. बारामतीच्या इतिहासात मोलाची भर घालणारा हा अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे
बारामती काशिविश्वेश्वर मंदिरात या महजराचे वाचन करण्यात आले.
काही ठळक वैशिष्ठये –
१. बारामतीच्या इतिहासात पाटीलकी संबंधाने तिन्ही निवाड्यात ढवाण हेच खरे पाटील ठरले
२. कऱ्हा नदीचे नाव या कागदपत्रात ब्रह्मकमंडलू नदी असे आहे. हेच नाव श्री शिवलीलामृत संचातही आहे.
३. या न्यायनिवाड्यास देशमुख, देशपांडे, बारामतीच्या आजूबाजूच्या बारा गावांच्या पाटील-मोकदम, तसेच कसब्याचे बलुतेदार व समस्त गावकरी यांची उपस्थिती असून त्यांची नावे या महजरात दिसतात.
४. इ.स. १७२३ साली म्हणजे ३०० वर्षापूर्वी झालेल्या या निवाड्यानंतर पुन्हा बारामतीच्या पाटीलकीसंबंधात बाद झाल्याचे दिसून येत नाही. (Baramati)
राजेंद्र ढवाण, राजीव देशपांडे, किरण सातव, किशोर कानिटकर, विनयसिंग ढवाण, मयूर ढवाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यासाठी काशिविश्वेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंग उर्फ बबलू देशमुख व सर्व विश्वस्तांचे सहकार्य लाभले.
यावेळी सदर मजहराचा व्हिडीओ प्रतिबिंब बारामती या युट्यूब चॅनलवर मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला.
श्री.ओंकार चावरे यांनी बारामतीच्या इतिहासाला उजाळा देण्याचे महत्वपूर्ण संशोधन केले आहे.बारामती व परिसरात असे संशोधन करणाऱ्या अभ्यासकांना एकत्रित आणून बारामतीचा इतिहास उजेडात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत श्री विनोद खटके व श्री मनोज कुंभार यांनी सांगितले. कोणाकडे अशी दुर्मिळ कागदपत्रे असल्यास संपर्क करण्याचे आवाहन श्री.ओंकार चावरे यांनी यावेळी केले.
हेही वाचा :
रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश
दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत
मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार
कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर