Wednesday, January 22, 2025

महाराष्ट्राच्या नादाला कोणी लागला की त्याचा हतबल औरंगजेब होतो !

फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला – अंतिम पुष्प

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडूलकर : “महाराष्ट्राच्या नादाला कोणी लागला की त्याचा हतबल औरंगजेब होतो! उभ्या हिंदुस्थानात औरंगजेबाशी टक्कर घेणारा वीरयोद्धा म्हणून शंभूराजांचा लौकिक होता!” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे – पाटील यांनी श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे मंगळवार, दिनांक १६ मे २०२३ रोजी केले.

जय भवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेत ‘छत्रपती संभाजीमहाराज : धगधगती अंगारगाथा’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना प्रा. नितीन बानगुडे – पाटील बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार गोविंद वाकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच माजी नगरसेवक राजू दुर्गे, उल्हास शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते गणेश लंगोटे, प्रा. बी. आर. माडगूळकर, ॲड. लक्ष्मण रानवडे आणि जय भवानी तरुण मंडळाचे अध्यक्ष मारुती भापकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. नितीन बानगुडे – पाटील पुढे म्हणाले की, “१४ मे १६५७ रोजी जन्मलेल्या शंभूराजे या बाळाला दोन वर्षांचा असतानाच मातृप्रेमाला पारखे व्हावे लागले. जिजाऊ माँसाहेबांनी त्यांचे संगोपन केले. इंग्रजीसह सोळा भाषांमध्ये प्रावीण्य संपादन करणाऱ्या शंभूराजे यांनी बालवयातच ‘बुधभूषणम्’ सहित अनेक ग्रंथांचे लेखन केले होते. मिर्झा राजे जयसिंग याने स्वराज्यावर आक्रमण केल्यावर आठ वर्षांच्या शंभूराजे यांना त्यांच्याकडे ओलीस ठेवावे लागले; आणि या प्रसंगातून शंभूराजे यांचा राजकारणात प्रवेश झाला. उत्तम संगीतज्ञ, मल्लविद्या प्रवीण शंभूराजे शिवाजीमहाराज यांच्यासोबत आग्रा येथे औरंगजेबाच्या दरबारात गेले; आणि त्यानंतरच्या प्रसंगांनी त्यांचे जीवन बदलून टाकले. आग्र्याहून सुटका करून घेताना राजकीय डाव म्हणून शिवरायांनी बाल शंभू यांचे निधन झाल्याची वार्ता प्रसारित केली अन् तेव्हापासूनच मृत्यू शंभूराजांचा पाठलाग करीत राहिला. पुढे कपट कारस्थानांतून तीन वेळा त्यांच्यावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला गेला.

शंभूराजे यांनी आपल्या अल्पायुष्यात १२४ लढाया लढून एकदाही हार पत्करली नाही. याचबरोबर छत्रपती म्हणून अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले. धर्मसंस्थांना सनदा बहाल केल्या. छत्रपती शिवाजीराजे यांच्यासारखेच शंभूराजे यांचे चारित्र पवित्र होते.ॲबे कॅरे, खाफीखान, ग्रॅण्ड डफ यांनी शंभूराजे यांचा इतिहास लिहिला आहे;काही इतिहासकारांनी शंभूराजे यांचे रगेल अन् रंगेल असे विकृत, बदनामीकारक चित्र रेखाटले आहे. त्यांच्या जीवनावर २७ चित्रपट आणि ६० नाटकं लिहिली गेली; पण त्यामधून त्यांची स्त्रीलंपट, स्वराज्यद्रोही अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. वास्तविक दिवसातील वीस तास घोड्यावर मांड ठोकून शंभूराजे यांनी एकाचवेळी बारा आघाड्यांवर वेगवेगळ्या शत्रूंचा मुकबला केला.‌ महाराष्ट्रासह नऊ प्रांतात त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते.

औरंगजेबाने सातत्याने नऊ वर्षे आपले बलाढ्य सरदार आणि प्रचंड फौजफाटा पाठवूनही संभाजीराजे यांच्या विरोधात त्याला एकदाही विजय मिळवता आला नाही. दुर्दैवाने राजपुतांनी शंभूराजे यांना मदत केली नाही, ऐनवेळी अकबराची दिशाभूल झाली आणि कपटाने संगमेश्वर येथे त्यांना कैद करण्यात आले. चाळीस दिवस त्यांच्यावर अनन्वित अत्याचार झाले; पण पंचप्राणांचे समर्पण देऊन शंभूराजे औरंगजेब बादशहापुढे झुकले नाहीत. एवढेच नाही तर शंभूराजांच्या बलिदानानंतरही त्याला स्वराज्यावर विजय मिळवता आला नाही. अखेर पराभूत, हतबल अवस्थेत औरंगजेबाला मरण स्वीकारून महाराष्ट्राच्या मातीत मिसळावे लागले. मराठे परिस्थितीवर रडत बसले नाहीत; तर परिस्थितीशी लढले. प्रतिकूल परिस्थितीला कसे अनुकूल करावे, हे शंभूराजांच्या युद्धनीतीने त्यांना शिकवले होते!” अतिशय ओघवत्या वक्तृत्वशैलीतून नितीन बानगुडे यांनी शंभूराजे यांचा जाज्वल्य इतिहास कथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

मारुती भापकर यांनी प्रास्ताविकातून, “अनेक नामवंत व्याख्यात्यांनी फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेत आजपर्यंत वैचारिक मंथन केले आहे. पिंपरी – चिंचवड शहरात या व्याख्यानमालेने मोठ्या प्रमाणावर लोकमान्यता मिळवली याचे समाधान आहे!” अशी भावना व्यक्त केली. गोविंद वाकडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “माध्यमांमध्ये नैतिकता राहिली नाही!” अशी खंत व्यक्त केली.

जर भवानी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. मारुती भापकर यांनी आभार मानले.

हे ही वाचा :

आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन वाढ, राज्य सरकारचा निर्णय

झेडपीच्या सरळसेवा भरतीसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

UPSC मार्फत 12वी ते पदवीधरांसाठी मोठी भरती जाहीर

गौतमी पाटील ने साताऱ्यात जाऊन छत्रपती उदयनराजे भोसलेंना दिली “ही” बाटली भेट..

सैन्यदलातील अधिकारी पदभरती परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी 

Related Articles

- Advertisement -

Latest Articles