Wednesday, February 5, 2025

कुकडी, मिना पूर्व आणि पश्चिम पट्ट्यातून आशाताई समर्थक साथ साथ, आता फक्त कामळाचीच बात !

जुन्नर / रविंद्र कोल्हे: जुन्नर तालुक्यात राजकीय भूकंप होणार असून, भाजपच्या गोटात राजकीय फटाक्यांचा आवाज तर शिवसेना गोटात पूर्ण सन्नाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दिवाळीसह फराळ आणि एकूणच आनंदमय वातावरण पसरणार आहे. असं विश्लेषण करण्याचं कारण म्हणजे नारायणगाव जिल्हा परिषद गटातील सदस्या, एकेकाळच्या शिवसेनेच्या सिंधुताई, त्याचप्रमाणे पूर्वाश्रमीच्या भाजप सदस्या आशाताई बुचके यांचा स्वगृही परतण्याचा निश्चय झाला आहे. आणि आगामी भाजपच्या जुन्नर विधानसभा उमेदवार आशाताई बुचके ह्याच असतील हे ही यानिमित्ताने आता निश्चित झाले आहे.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आशाताई बुचके या कट्टर शिवसैनिकाची पक्ष नेतृत्वाने हकालपट्टी केली. याला कारण असे की, शिवसेनेत आदेश नसतांना केलेले शक्ती प्रदर्शन होते. अर्थातच शक्ती प्रदर्शन उमेदवारी मिळावी म्हणूनच होते. मात्र याचा फटका शिवसेनेला बसणार हे निश्चित होते. ताईंना दोन वेळा तिकीट दिले आहे. त्यांचा पराभव झाला आहे आता त्यांनी शांत बसावे नवा भिडू बाहेर काढू असं नेतृत्वाला वाटत होतं, मात्र असं असलं तरी ताईंची मतांची टक्केवारी नेतृत्वाने विचारात घेतली असती तर ताईंना तिसऱ्यांदा तिकीट देऊन शिवसेनेला फायदाच झाला असता, हे ताईंनी अपक्ष उमेदवार पंचवीस हजार मतं घेऊन स्पष्ट केले आहे. ताईंना जेव्हा प्रथम तिकीट दिले तेव्हा माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या विरुद्ध झालेल्या सरळ लढतीत ताईंचा पराभव अवघ्या चार हजार मतांनी झाला. म्हणजेच टक्केवारीतही शिवसेना उमेदवार राष्ट्रवादी आणि त्यातही प्रस्थापित उमेदवारापेक्षा शिवेनेला मिळालेल्या मतांची टक्केवारी जास्तच होती.

दुसऱ्यांदा मनसेच्या तिकिटावर शरद सोनवणे उमेदवार होते, राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार अतुल बेनके यांना उमेदवारी दिली होती, आणि शिवसेनेकडून आशाताई यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादीच्या बंडाळीचा आणि शिवसेनेतील फुटीरांचा फायदा शरद सोनवणे यांना झाला. मात्र तेव्हाही शिवसेना उमेदवार यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी राष्ट्रवादी पेक्षा जास्त होती. हाच विचार राष्ट्रवादी काँग्रेसने सन २०१९ च्या निवडणुकीत केला आणि आमदार अतुल बेनके यांना पुन्हा उमेदवारी देऊन सन २०१४ प्रमाणे दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ करून घेतला. किंबहुना ते होणारच होते. आताही माजी आमदार सोनवणे यांना जागेवर ठेवून, जर आशाताई बुचके यांना उमेदवारी दिली असती तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. मात्र पक्षनेतृत्वाने ताईंची हकालपट्टी केली. आणि तिथेच ताईंनी जनतेच्या दरबारातून आपली ताकद पक्षाला दाखवून दिली.

ताईंनी भाजप मध्ये जाण्याचा निर्णय का घेतला हे माहीत करून घेण्यापेक्षा ताई भाजपमध्ये(स्वगृही)परतल्याचा जास्त फटका शिवसेनेला बसणार आहे. हे निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसला नारायणगाव गट, सावरगाव गट येथे चांगला फायदा होईल. त्यामुळेच मला असं म्हणावेसे वाटते की राष्ट्रवादी काँग्रेस दिवाळीतील मिठाई बरोबर राजकीय फटाके फोडणार आहे.

सन २०१९ च्या निवडणुकीत ओतूर आणि पूर्व पट्ट्यातील शिवसेनेचे बालेकिल्ल्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला झेंडा फडकवला आहे. तर पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, पूर्व पट्ट्यातून अजित बांगर हे ताईंबरोबर आहेत, राहणार असंच वचन त्यांनी ताईंना दिले आहे. म्हणजेच पूर्व आणि ओतूर पट्ट्यातील शिवसेनेचे राहिले सुहिले  शिलेदारही समर्थक म्हणून आता ताईंबरोबर जय श्रीराम करणार. बेल्ह्याचे किशोर तांबे म्हणतात ‘आता पुढच्या पंचवार्षिकला आशाताईंच आमदार असणार’.

बेल्ह्याचेच मोहन मटाले म्हणतात की, “ताई हाच पक्ष ताई हाच झेंडा” डिंगोऱ्याचे जयवंत शेठ शेरकर म्हणाले की, आता कोणी कितीही बोलावले तरी शिवसेनेत जाणार नाही. गांजाळे म्हणाले ‘आता ताई सोबत राहू’ तर बांगर म्हणाले ‘ताई तुमचा निर्णय आम्हास मान्य’ ओतूरचेच ऋषी डुंबरे म्हणाले ‘आशाताई तुमच्या निर्णयास आम्ही बांधील आहोत’. कुकडी पट्ट्यातील काळवाडी चे सरपंच आशाताई ‘पक्ष कोणताही असुद्या काळवाडी तुमच्या सोबत’ आहे. 

पिंपळवंडीचे नितीन काकडे म्हणाले की “आयुष्यभर तुमची सावली म्हणूनच राहणार आता एकच पक्ष भाजप. वडगाव कांदळी”चे हरिभाऊ घाडगे म्हणतात’. आशाताईंना आता एकच पर्याय भाजप बोरीचे जाधव म्हणाले “ताई तुम्ही सेनेत गेला तरी सेनेचं काम करणार नाही. टायगर पाचपुते म्हणाले “कुणीही आडवे आले तरी आडवे करू पण ताई तुमच्या सोबतच”.

पश्चिम पट्ट्यातील नितीन कोकाटे तलेरान म्हणतात की “पिंपळगाव डिंगोरे गट अग्रेसर राहणार आहे” पंडित मेमाने म्हणाले “धनुष्य मागे राहिले तर राहुद्या बाण तुमच्या सोबत आहे. महेंद्र सदाकाळ म्हणाले “चला श्रीरामाचे पाईक होऊया;आशाताई आमदार झालेले पहायचय.

मीना पट्ट्यातील नारायणगाव, वारुळवाडी, सावरगाव, गुंजाळवाडी आणि वडज येथील शिवसेनेचे बुरुंज ढासळतील राष्ट्रवादी काँग्रेस येथे फायदा उठवते का हे काही दिवसात स्पष्ट होईल. हे शिवसेनेचे पारंपारिक बाले किल्ले आहेत. नारायणगाव सन १९९१, त्यानंतर गुंजाळवाडी, वडज सावरगाव आणि मांजरवाडी या ठिकाणी शिवसेनेने आपले पाय भक्कम रोवले. नारायणगावचे भूमिपुत्र व माजी कामगार मंत्री साबिरभाई शेख यांच्या नंतर बाळासाहेब दांगट आणि त्यानंतर शिवसैनिकांना आधार दिला तो फक्त आशाताई बुचके यांनीच म्हणून तर मी त्यांना शिवसैनिकांच्या सिंधुताई म्हणालो. माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला तेव्हा शिवसैनिक अक्षरशः पोरका झाला होता. अशावेळी ताईंनी आधार दिला आणि तो आजपर्यंत टिकवून धरला होता. 

मात्र आता नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सन २०१७ ला किंगमेकर म्हणून ज्यांची ओळख निर्माण केली. ते विघ्नहर सहकारी साखर करखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर अशाताईंबरोबर आहेत. नाना नारायणगाव – खोडद गटातून भाजपचे उमेदवार निश्चित असल्याचे मानले जाते, तर सरपंच मेहेर म्हणाले “ताई एक वाघ तुमच्या सोबत आला दुसरा पण येणारच” 

निरगुडे सरपंच दिलीप शिंदे म्हणतात की,” ताईआम्ही तुमच्या सोबत राहणार”! कुसुरचे सरपंच समीर हुंडारे म्हणाले “माझ्या कार्यकर्त्यां सोबत; ताई तुमच्या सोबत माझाही पक्ष प्रवेश” खोडद”, चे सरपंच म्हणाले “ताई तुमच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळते आम्ही तुमच्या सोबतच”. सावरगाव’चे लहू पाबळे म्हणाले “ताई जिकडे तिकडे मी काठी घेऊन उभा राहणार”. वडजचे विवेक चव्हाण म्हणतात की, ज्यांनी हकालपट्टी केली तेच आज पायघड्या घालत आहेत” मात्र आम्ही ताईसोबतच! सावरगाव”चे उपसरपंच दीपक बाळसराफ म्हणाले “ताई कापलं तरी अडदांग दीपक तुमचाच” गुंजाळवाडीचे रमेश ढवळे म्हणतात की, “गुंजाळवाडिकर ताईंसोबतच राहणार”.

जुन्नर शहरातून या पक्ष प्रवेशावर काय प्रतिक्रिया उमटतात पाहू या “संपूर्ण जुन्नर शहर ताईंसोबत असल्याचे उद्योजक अनिल रोकडे म्हणाले तर शिवदर्शन खत्री म्हणतात की “जुन्नर नगर परिषद आता आशाताईंची होणार”.

 

आशाताई बुचके यांचा प्रवेश निश्चित असल्याने आता शिवसेनेला डॅमेज कंट्रोल करावं लागणार तर राष्ट्रवादी काँग्रेसला याचा फायदा होणार असला तरी सावध आणि आक्रमकता सांभाळून पावले टाकावी लागतील यात शंकाच नाही. नारायणगाव आणि पिंपळवंडी गटातून राष्ट्रवादी काँग्रेसला आशाताई बुचके यांच्या भाजप प्रवेशाचा फायदा होणार असला तरी या दोन गटातील जीर्ण झालेल्या गोधड्या बदलाव्या लागणार आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला नवखे उमेदवार शोधावे लागणार आहे. या दोन्ही ठिकाणी शिवसेनेच्या विभजनाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसलाच होईल यात शंखा नाही.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles