मुंबई, दि. २५ : राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्या माध्यमातून साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात या इंजेक्शनच्या 60 हजार व्हायल्स आंतरराष्ट्रीय स्तरावरून थेट महाराष्ट्रात दाखल होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे टोपे यांनी संगितले.
मंत्रालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आणि म्युकरमायकोसीस आजाराबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर माध्यमांना माहिती देतांना आरोग्यमंत्री टोपे बोलत होते.
ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जातात. ग्रामीण भागातील कोरोनाची साथ रोखतानाच आता आशा स्वयंसेविकांना रॅपीड ॲण्टीजेन चाचणी आणि स्वयंनिदान चाचणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सुमारे 70 हजाराच्या आसपास आशा स्वयंसेविका आहेत.