नागपूर : आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय टी यू) नागपूर तर्फे महानगरपालिका व जिल्हा परिषद जागेराव करून मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांना कॉ. राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, माया कावळे, कांचन बोरकर, रुपलता बोंबले, पिंकी सवाईथूल, अर्चना कोल्हे तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौम्या शर्मा यांना कॉ. राजेंद्र साठे, सरला मस्के, सारिका लांजेवार, रेखा पानतावणे, मोनिका गेडाम, पूजा मानकर यांनी मागणीचे निवेदन सादर केले.
संपा दरम्यानचे मानधन कपात करण्यात येऊ नये, दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत राज्य शासनाने जीआर काढावा, त्याकरता महानगरपालिका व जिल्हा परिषद यांनी शासनाला संदेश पाठवावा. अशा विविध मागणी घेऊन निवेदन सादर करत शेकडो आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी घेराव केला.

महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील मुख्य प्रवेशद्वारासमोर शेकडो आशा वर्कर यांनी ठाण मांडल्यामुळे इमारतीचे मुख्य दार बंद करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेंद्र बहिरवार यांनी बाहेर येऊन सर्व आशा वर्कर यांना मार्गदर्शन करत आज पर्यंत दिलेले सर्व पत्रांची शहानिशा करत तात्काळ संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
सीटू तर्फे २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पासून सतत २४ तास रात्रंदिवस काळे वस्त्र धारण करून शासनाच्या कामगार विरोधी भूमिकेचा निषेध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्य शासनाने आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास २९ जानेवारी रोजी कामगार संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे आजाद मैदान, मुंबई येथे आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विशाल धरणे आंदोलन करण्यात येणार असा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याकरता नागपूर मधून हजारो आशा वर्कर व गटप्रवर्तक मुंबई करता रवाना होतील. अशी माहिती एका पत्रकाद्वारे कॉ. राजेंद्र साठे यांनी दिली.