विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आता विश्वव्यापी ज्ञान मिळवण्याची साधने प्राप्त झाली आहेत आता प्रत्येक विद्यार्थ्यांने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी.
– प्रा.डॉ.सदानंद मोरे सर
पिंपरी चिंचवड, दि. १६ : खडकी येथील रणगाडा देखभाल दुरुस्ती डेपोतील कर्मचाऱ्यांच्या १० वी,१२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतूक समारंभ आणि सन्मान पुरस्कार सेंट्रल एएफव्ही डेपो कर्मचारी क्रेडिट सोसायटी, एमटीएसएसडी वर्कर्स युनियन हॉल, खडकी येथे मंगळवार १६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना जेष्ठ साहित्यिक, संतसाहित्य अभ्यासक डॉ.सदानंद मोरे प्रमुख पाहुणे ब्रिग्रेडीअर कामांडन्ट विजयसिंह यांचे हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले.
त्यावेळी बोलताना डॉ.सदानंद मोरे म्हणाले की, जगातील सर्व ज्ञान तुमच्या हातात आले आहे. गुगल, युट्यूबच्या माध्यमातून सर्व ज्ञानाचे ब्रह्मांड नजरेसमोर येत आहे. आमच्या काळात जग शांत होते. सातवीची केंद्रीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलामुलींचे भाग्य गतकाळात उजळत होते. नंतर मॅट्रिक पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची यादी घेण्यासाठी पोस्ट, बँक, सरकारी खात्यातील अधिकारी बोर्डात चौकशी करायचे आणि घरी पण यायचे. त्या मुलांना सरकारी नोकऱ्या सहज मिळायच्या, असे सांगून डॉ.सदानंद मोरे पुढे म्हणाले की, आजचा जमाना स्पर्धा आणि गुणवत्तेचा आहे, आपला मार्ग आपणच शोधायचा आहे, तुमच्यासमोर राजमार्ग आहे, मुंबई, पुणे, बंगलोर, दिल्ली कुठे जायचे याच्या पाट्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा दिवे आहेत. २५ वर्षांपूर्वी असे काही नव्हते. हे कलियुग म्हणजे कलह युग आहे, येथे अस्तित्वासाठी कलह सुरू आहे. आम्ही दहावी आणि बारावी या परीक्षांना पहिले आणि दुसरे महायुद्ध असे समजतो. तुम्ही सर्वजण अतिशय चांगले मार्क्स तुम्ही मिळवून ही युद्धे जिंकली आहेत, तुमच्या आवडीच्या विषयात करिअर करा. वाचन करा. सतत बदलणाऱ्या जगातील गरजांचा अभ्यास करून कळपाच्या मागे न लागता विद्यार्जन करा.
सामान्य ज्ञानाची (GENERAL KNOLEDGE) ची पुस्तके नसतात, त्यासाठी वाचन करायचे असते.
या जगात सुंदर जीवन जगायचे आहे, या जगात व्यवहार करायचे आहेत, त्या जगाचा भूगोल, इतिहास, व्यापार, अर्थकारण, राजकारण, संस्कृती समजून घ्या. कोलंबसला अमेरिकेला जायचा मार्ग शोधून काढताना निव्वळ कष्ट नव्हते तर धोका पण होता. परंतु जिद्द आणि चिकाटी होती. असे सांगून ते पुढे म्हणाले की, येथील दारुगोळा आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची तुम्ही मुले राष्ट्राची भूषणे आहात.
यावेळी प्रमुख पाहुणे ब्रिग्रेडीअर विजयसिंह, कामांडन्ट, सेंट्रल एएफव्हीडी डेपो खडकी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले ते म्हणाले की, संरक्षण उत्पादन क्षेत्रातील आमच्या या सर्व मुलांनी आता करिअरच्या संधीचा नव्याने विचार केला पाहिजे. सर्व काही सरकारी क्षेत्रात आहे. असे गृहीत धरू नये. उच्च शिक्षणाच्या सर्व क्षेत्रात तुम्ही स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी. पूर्वी श्रीमंतांच्या मुलांना संधी प्राप्त होत होत्या, आता दुर्बल घटकातील हुशार आणि एक्सलंट मुलांना प्राधान्य मिळत आहे. तुम्ही ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, उत्पादन क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. अविरत कष्ट आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रातील सुवर्ण संधी तुमच्यासाठी वाट पहात आहेत. गुणवंत प्रज्ञावंत व्हा. तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची मुले आहात, आम्ही वरिष्ठ अधिकारी सर्वतोपरी मदत करू, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सलीम सय्यद होते. या कार्यक्रमास यूनियनचे पदाधिकारी मोहन होळ, तुकाराम जाधव, प्रभाकर काळोखे, फिरोज सय्यद, सचिन कांबळे, लेफ्टनंट कर्नल एन पी सिंग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विनायक माठे यांनी केले, सूत्रसंचालन संजय दांगट आणि संयोजन सुरेश चव्हाण, अरविंद पाटील, गणेश बुर्डे, सुनील भुकन, रमेश चव्हाण यांच्यासह आभार प्रदर्शन अरविंद पाटील यांनी केले.
– संपादन : क्रांतिकुमार कडुलकर