Saturday, March 15, 2025

आता रस्त्यावर उतरून लढायचे… अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा “या” तारखेपासून संपावर जाण्याचा इशारा

पुणे : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने २० फेब्रुवारी २०२३ पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. यावेळी अंगणवाड्या बंद करून संपूर्ण कामकाज बंद ठेवण्यात येणार असल्याचेही अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेत्या शुभा शमीम यांनी सांगितले.

कृती समितीने म्हटले आहे की, राज्य शासनाने आपले मानधन वाढवले, त्याला साडेपाच वर्षे उलटून गेली. केंद्र सरकारने वाढवल्याला साडेचार वर्षांचा काळ लोटला. दरम्यान आपण आपली सर्व कर्तव्ये तर पार पाडलीच पण कोरोना हटवण्यासाठी दिवस रात्र कष्ट घेतले. पण त्याचे फळ काय मिळाले? 

महागाई दुप्पटीने वाढली पण मानधनात वाढ नाही, अंगणवाड्यांच्या भाड्यात वाढ नाही, आहाराच्या दरात वाढ नाही, सेवा समाप्ती लाभ नाही, आजारपणाच्या रजा नाहीत, हक्काच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील गायब केल्या. डिजिटल इंडियाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारने जुना मोबाईल भंगारात जायच्या लायकीचा होऊनही, आपण वर्षभरापासून नवीन मोबाईलसाठी आंदोलन करूनही नवीन मोबाईल दिलेला नाही. इंग्रजी भाषेतील सदोष पोषण ट्रॅकर ॲप आपल्यावर लादला. आपल्या खाजगी मोबाईलवरून, जमत नसेल तर इतरांना वेठीला धरून तो भरायला भाग पाडले, उच्च न्यायालयाचे आदेश देखील धाब्यावर बसवले. न्यायालयाचे आदेश झुगारून आपला प्रचंड छळ केला, धमक्या दिल्या, असेही म्हटले आहे. ‌

सरकारने तारखांवर तारखा देत खोटी आश्वासने दिली. कृती समितीने आता रणशिंग फुंकले आहे. २० फेब्रुवारी २०२३ पासून बेमुदत संपावर जाणार आहोत. अंगणवाड्या बंद, सर्व कामकाज बंद. पोषण ट्रॅकर तर भरणारच नाही, पण अहवाल आणि माहिती पण देणार नाही. आता घरात बसून रहायचे नाही, रस्त्यावर उतरून लढायचे, हा निर्धार महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे.

• आंदोलनाचा कृती कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

1. १ फेब्रुवारीला राज्य शासन आणि प्रशासनाला संपाची नोटीस बजावली जाईल.

2. २० फेब्रुवारीपासून बेमुदत संप सुरू होणार.

3. प्रकल्प, जिल्हा, राज्य स्तरावर सातत्याने आंदोलने केली जाणार.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
Lic

Related Articles

- Advertisement -

Latest Articles