Thursday, April 25, 2024
HomeNewsबलशाली भारतासाठी एकात्म मानवतावादाचा जागर व्हावा:कुलगुरू डॉ.कारभारी काळे

बलशाली भारतासाठी एकात्म मानवतावादाचा जागर व्हावा:कुलगुरू डॉ.कारभारी काळे

साहित्यिकांचा कृतज्ञता सन्मान सोहळा

पुणे/क्रांतिकुमार कडुलकर: दि.१२- ‘
लेखन करणे ही सोपी गोष्ट नाही. आजुबाजूच्या जगातले दुःख हेरून आणि माणसा माणसातील दुही नष्ट होण्याचा प्रयत्न साहित्यिकांनी करायला हवा,अनेक साहित्यिक हे करत आहेत.त्यांच्या लेखणीतून एकात्म मानवतावादी विचारसरणीचा जागर केला तर जागतिक स्तरावर बलवान भारत निर्माण होईल’. असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन,विद्यार्थी विकास मंडळ,मातंग साहित्य परिषद आणि समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आज महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून पद्मश्री दादा इदाते,पद्मश्री रमेश पतंगे, पद्मश्री डॉ.प्रभाकर मांडे यांना कृतज्ञता सन्मान व महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या साहित्यकृतीला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाङ्मय पुरस्कार वितरण समारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी डॉ.कारभारी काळे बोलत होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ अनिरुद्ध देशपांडे, आमदार सुनील कांबळे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे, मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे, समरसता साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ.प्रसन्न पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.संतोष परचुरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी पद्मश्री दादा इदाते यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले, “म.ज्योतिराव फुले यांनी महाराष्ट्रात सामाजिक कृतज्ञता प्रथमतः रुजवली‌
त्यांच्या “विद्येविना मती गेली “या वाक्यापासून प्रेरणा घेऊन मी कोकणात सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केले आहे. ‘साहित्यरत्न असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची एकाही मराठी समीक्षकांनी दखल घेतली नाही अशी खंत व्यक्त केली.

पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.देवदत्त दाभोळकर यांनी ‘समरसता हे जीवनमूल्य आहे असा उद्घोष केला. आम्हाला सामाजिक समरसता म्हणजे दुसरे तिसरे काही नसून सामाजिक जीवनातील सर्वांचा एकत्रित विचार करणे म्हणजेच समरसतेचा विचार करणे होय,असे प्रतिपादन केले.यावेळी पद्मश्री रमेश पतंगे यांनीही आपले विचार मांडले . प्रास्ताविक अध्यासन प्रमुख डॉ सुनील भंडगे यांनी केले तर आभारप्रदर्शन व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर केले. सूत्रसंचालन डॉ.प्रसन्न पाटील यांनी केले. ७० साहित्यिकांच्या यादीचे वाचन डॉ.धनंजय भिसे यांनी केले. यामध्ये डॉ.श्यामा घोणसे, संपत जाधव, डॉ.रविंद्र रारावीकर, शाहीर शिवाजीराव पाटील आदी ७० लेखकांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाङमय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय