Tuesday, November 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAmit Gorkhe : पेपर विक्रेता ते विधान परिषद आमदार ; भाजपाचे अमित...

Amit Gorkhe : पेपर विक्रेता ते विधान परिषद आमदार ; भाजपाचे अमित गोरखे यांचा खडतर प्रवास

मातंग समाजाचे विधान परिषदेवर जाणारे ते पहिले युवा आमदार (Amit Gorkhe)


पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : एका सर्व सामान्य गरीब कुटुंबामध्ये दिनांक 4 नोव्हेंबर 1980 रोजी पुणे येथील मुंढवा येथे अमित गोरखे यांचा जन्म झाला. आई अनुराधा आणि वडिल गणपत गोरखे हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे जवळच्या लोणी व्यंकनाथ या मूळ गावचे. गणपत गोरखे त्याकाळी मुंढव्याच्या भारत फोर्ज मध्ये सिक्युरिटी चे काम करीत होते. (Amit Gorkhe)

अमोल आणि अश्विनी हे दोघे अमित गोरखे यांचे भाऊ-बहीण कमवणारा एक आणि खाणारी तोंडे पाच अशी परिस्थिती. 1982 साली गणपती गोरखे यांनी भारत फोर्ज मधील नोकरी सोडून दिली आणि चिंचवडच्या रस्टन ग्रीव्हज कंपनीत ते वॉचमन म्हणून रुजू झाले. (Amit Gorkhe)

चिंचवडला ते एका पत्र्याच्या घरात स्थायिक झाले. चिंचवड येथील महानगरपालिकेच्या काळभोर नगरच्या स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेत अमित गोरखे यांचे चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण पार पडले आणि पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण पिंपरी चिंचवड मनपाच्या माध्यमिक विद्यालयात झाले. त्यांच्या आईची इच्छा होती की त्यांनी पुण्यामध्ये कॉलेजमध्ये शिकायला जावे म्हणून त्यांनी अकरावीच्या वर्गासाठी शिवाजीनगरच्या मॉडर्न महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला, याच महाविद्यालयातून ते भूगोल विषय घेऊन बीए फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झाले.

पुढे एलएलबी ची पदवी त्यांनी सिम्बॉयसिसच्या लॉ कॉलेजमधून घेतली परंतु काही अडचणीमुळे त्यांना तिसऱ्या वर्षाची परीक्षा देता आली नाही. पुढे त्यांनी सोशिओलॉजी मधून एम. ए. केलं. व पुणे विद्यापीठातून एमबीए एच आर मध्ये डिस्टिंक्शन मध्ये पास केले, त्यांच्या शैक्षणिक प्रवासात त्यांना अनेक अनंत अडचणी आल्या. घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेताना कितीतरी यातना भोगाव्या लागल्या. 1985 च्या दरम्यान संपूर्ण कुटूंब काळभोर नगरच्या एका चाळीमध्ये राहायला आले.1988 मध्ये चाळीसमोरच एका निवासी संकुलाचे काम सुरू होते या ठिकाणी त्यांनी एक फ्लॅट बुक केला.

गणपत गोरखे यांनी त्यासाठी काही मित्रांकडून, नातेवाईकांकडून कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते फेडताना संसार चालवणे कठीण झाले आणि एक दिवस अचानकच ते घरातून निघून गेले. दीड वर्ष ते बेपत्ता होते पदरात लहान मुले आणि त्यांचे शिक्षण, नातेवाईकांचा तगादा अशा परिस्थितीत त्यांच्या आईने कंबर कसली.

मोठ्या धीराने येणाऱ्या प्रत्येक दिवसाची झगडत, कष्ट करीत असतांना सुदैवाने त्यांना चिंचवडच्या मल्याळी समाजम् या संस्थेत बालवाडी शिक्षिका म्हणून काम मिळाले. साऱ्या कुटुंबावर कुर्‍हाड कोसळलेल्या त्या दिवसात अमोल कच्ची दाबेली विकणे आणि अमित घरोघरी वृत्तपत्र टाकण्याचे तथा एसटी स्टँडवर काकडी विकण्याचे काम करू लागले. महिन्याकाठी 120 रुपये अमित जी ना मिळत होते. (Amit Gorkhe)

९-१० वर्षाचा अमित गोरखे शाळा संभाळून काळभोर नगरच्या एसटी स्टँडवर काकडी विकत असे एसटीमध्ये प्रवाशांसमोर प्रत्येक प्रवाशासमोर उभा राहून गोळ्या बिस्किटे, काकडी शेंगदाणे आणि पाण्याच्या बाटल्या यांची विक्री करत असे.

व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आई-वडिलांना मदत व शिक्षणही सुरू झाले. दरम्यानच्या कालखंडात त्यांनी एका कंपनीत हेल्पर म्हणूनही काम केले. दीड वर्षाच्या कालावधीनंतर या कुटुंबाचा आधार एक दिवस अचानक परत आला, आयुष्याच्या पौगंडावस्थेत सर्व सुखांना पारखा झालेल्या अमित गोरखे यांनी धावपळींना कंटाळून न जाता कष्टाचे डोंगर उपसले, यशाची एक एक पायरी चढत असतांना आईने मनात रुजवलेले उच्च शिक्षणाचे बीज जोपासत ते पदवीधर झाले.

वडिलांनी केलेली अपार मेहनत व आईचे संस्कार याच्या बळावर
आपली स्वतःची शिक्षण संस्था असावी ही महत्त्वाकांक्षा ठेवून 2003 साली चिंचवड येथे दोन गाळे भाड्याने घेऊन कॉम्पुटर क्लासेस सुरू केले, त्यात महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण ही दिले. काळभोर नगर चिंचवड येथील राष्ट्रतेज मंडळाच्या माध्यमातून जिवंत देखाव्याची संकल्पना त्यांनी प्रथमच लोकप्रिय केली होती. व तेथेच कलारंग या सांस्कृतिक संस्थेची निर्मिती झाली.

पिंपरी चिंचवड मधील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देण्याचे काम कलारंग संस्थेने त्यावेळेस पासून चालू केले, नोव्हेल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च या शैक्षणिक ट्रस्टची स्थापना त्यांनी 2002 मध्ये केली. त्यावेळी त्यांचे वय अवघे 22 वर्षाचे होते, तदनंतर काही वर्षांनी त्यांची आई अनुराधा गोरखे यांना अमित गोरखे यांच्या सामाजिक तथा शैक्षणिक सलोख्याच्या जोरावर व आईच्या कर्तृत्वावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नेतृत्व करण्याची संधी मिळाली.

त्यांनी प्रभाग अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. प्रभागाचा विकास करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, आईच्या बरोबरीने अमित गोरखेंनी शहराच्या विकासात योगदान दिले.

त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रिया गोरखे या आयुर्वेदिक डॉक्टर असून त्यांनी एमबीए करून हॉस्पिटल मॅनेजमेंट मध्ये पीएचडी मिळवलेली आहे. नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापन त्याच बघतात. त्यांचा भाऊ अमोल गोरखे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची वहिनी ह्या गृहिणी आहेत. त्यांची बहीण अश्विनी शेंडगे या मुंबईत स्वतःची सेलिब्रिटी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवतात व त्यांचे मेहुणे श्री सचिन शेंडगे हे wisdom करिअर अकॅडमी नावाची संस्था चालवतात. (Amit Gorkhe)

आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने पिंपरी चिंचवड काळभोर नगर परिसरातील मुला-मुलींनी एकत्र येऊन परिसरात सांस्कृतिक वाटचाल सुरू करण्याच्या दृष्टीने 1999 मध्ये कलारंग सांस्कृतिक कला संस्था सुरू केली.त्यावेळेस संस्थेतील सर्व मुले कॉलेज करून इतर उद्योग सांभाळात होते व संस्था रजिस्टर करण्यासाठी लागणारी रक्कम संस्थेकडे उपलब्ध नव्हती. वर्षभर प्रत्येकाने थोडे थोडे पैसे जमवून अमित गोरखे यांच्या पुढाकाराने संस्था नोंदणी करण्यात आली. पिंपरी चिंचवड मधील नवीन कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे हा या संस्थेचा उद्देश होता. कलारंगच्या माध्यमातून आजपर्यंत 200 हून अधिक प्रतिष्ठित कलाकारांना ‘कलागौरव’ पुरस्काराने गौरविले आहे.

कलारंग संस्थेचा पहिला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य व खासदार डॉ नरेंद्र जाधव यांना देण्यात आला होता. अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, सचिन – सुप्रिया पिळगावकर , नाना पाटेकर अशा महान 150 पेक्षा जास्त अभिनेते, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक गायक यांना देण्यात आला आहे. या संस्थेने एड्स जनजागृती ,नदीपात्राची स्वच्छता अशा विविध सामाजिक उपक्रमांनाही व्यासपीठ दिले श्री नाना पाटेकर व श्री मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या नाम फाउंडेशनचा समन्वयक या नात्याने त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त कुटुंबांना मदत करण्याची संधी अमित गोरखे यांना मिळाली.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व खास करून मागासवर्गीय तथा घरगुती महिलांना कम्प्युटर प्रशिक्षण व सांस्कृतिक कार्य यासाठी 2012 चा केंद्र सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार पिंपरी चिंचवड पहिल्यांदा अमित गोरखे यांना राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते मिळालेला आहे.

2003 सुरू केलेल्या हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाला चांगली मागणी होती त्यावेळी विद्यार्थी पुण्याला जात असत. त्यांच्या सोयीसाठी निगडी येथे नोव्हेल संस्थेच्या माध्यमातून पहिले हॉटेल मॅनेजमेंटचे ( एनआयबीआर ) कॉलेज सुरू केले. त्यानंतर डी.एड. कॉलेजही सुरू केले. तद्नंतर बीबीए, बीसीए असे डिप्लोमा- डिग्री अभ्यासक्रम सुरू करुन शहराच्या शैक्षणिक विकासात भर घातली. नोव्हेल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च या शैक्षणिक संस्थेला 2005 साली पुणे विद्यापीठाने रीतसर मान्यता दिली.

महाराष्ट्र शासनाने चिंचवड एमआयडीसी मध्ये अडीच एकर जागा या संस्थेला मिळविण्यात अमित यांना यश आले. 2007 मध्ये त्या ठिकाणी एमबीए कॉलेज सुरू झाले. आज या जागेत नोव्हेल इन्स्टिट्यूट ची देखणी इमारत उभी आहे. नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल,हॉटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापन शास्त्रातील आणि संगणक शास्त्रातील अनेक अभ्यासक्रमांचे, स्किल डेव्हलपमेंट, कुकरी बेकरी , सायन्स कॉमर्स ज्युनिअर कॉलेज शिक्षण येथे दिले जाते. त्यांच्या संस्थेतून केजी ते पीजी पर्यंत हजारो विद्यार्थी बाहेर पडले आहेत.

त्यापैकी तीनशेहून अधिक विद्यार्थी भारताबाहेर काम करून नोव्हेल संस्थेचे नाव वाढवित आहे.शिक्षण हक्क कायदया अंतर्गत त्यांनी परिसरातील अनेक मुलांना शाळांमध्ये प्रवेश घ्यायला मदत केली आहे.
नोकरदार राहण्यापेक्षा अन्य दहा जणांना नोकरी देण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करता आली पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून पिंपरी चिंंचवड मधील नवउद्योजकांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी शहरात दोन महिन्याचा मोफत उदयोजकता विकास कार्यक्रम राबविला. त्या अंतर्गत व्यवसायाकरिता असणाऱ्या अनेक शासकिय योजनांची माहिती व व्यवसाय मार्गदर्शन या शिबिरात केले गेले.

१२०० पेक्षा जास्त लोकांनी ह्यात सहभाग घेतला होता.
सी एस आर च्या माध्यमातून गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना फ्रेंच जर्मन आणि संस्कृत भाषेचे मोफत शिक्षण दिले जाते त्याचबरोबर महाराष्ट्रातील चंद्रपूर बीड यासारख्या ठिकाणी असलेले सिकलसेल अँनेमिया याचे पेशंट शोधण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून सध्या सुरू आहे.

राजकीय प्रवास

शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कामे करत असताना आई अनुराधा गोरखे यांना महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर आईच्या बरोबरीने शहराच्या विकासात योगदान देत ते निष्ठेने काम करत राहिले.

लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून काम करत असताना राष्ट्रीय स्वयंसंघाचे प्रथमवर्ग देखील त्यांनी पूर्ण केलेला आहे,त्याच माध्यमातून पिंपरी चिंचवड शहराची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी संस्कार भारती या संस्थेचे प्रमुख म्हणून अमित गोरखे यांनी जबाबदारी पूर्ण केलेली आहे.

2012 मध्ये भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून भारतीय जनता पक्षात प्रदेश सदस्य ते प्रदेश सचिव असा प्रवास करताना त्यांची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळावर अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. या महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून समाजउत्थानासाठी सदोदित झटण्याचे काम त्यांनी केले. त्याच वर्षी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त टपाल तिकिटाचे विमोचन आणि बोधचिन्हाचे अनावरण मुंबई येथे तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

एमजीडी या संस्थेच्या माध्यमातून रशियामध्ये मॉस्को शहरात शासकीय वाचनालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभ हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या मुदत कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, लघू पूर्ण योजना, मातंग समाजाच्या युवक युवतींसाठी देशांतर्गत शिक्षण योजना, बीज भांडवल शिष्यवृत्ती योजना, थेट कर्ज योजना यातील अटी शिथील करुन लाभार्थ्यांना त्याचा उपयोग व्हावा यासाठी ते स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून पाठपुरावा करत असतात.

त्यांच्या मतदारसंघातील एका कार्यकर्त्याचे खुब्याचे आॕपरेशन करायचे होते. तो गरीब असल्याने त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत हवी होती, त्यासाठी बराच पाठपुरावा करुन ते मार्गी लावण्याचे काम अमित गोरखेंनी केली.

मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेषतः शैक्षणिक विकासासाठी बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना व्हावी ह्या मागणीचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा करुन ती मागणी मान्य करुन घेतली.

अटलबिहारी वाजपेयी, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण हे त्यांचे राजकिय क्षेत्रातील आदर्श आहेत. देवेंद्र फडणवीसांना ते गुरुस्थानी मानतात.

पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर भाऊ मुनगुंटीवार, आशिष जी शेलार, विनोद तावडे, गिरीशजी महाजन या सर्वांना ते फॉलो करतात व त्यांच्याच माध्यमातून राजकीय व सामाजिक ज्ञान आत्मसात करण्याचे काम ते करीत आहेत.

अविश्रांत श्रम करुन इप्सित साध्य करण्याची महत्वाकांक्षा असेल तर यशाचे उत्तुंग शिखर गाठता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमित गोरखे.
नुकतीच संपूर्ण महाराष्ट्रातून विधानपरिषदेसाठी त्यांची सदस्य म्हणून निवड भाजपाने करून त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे.



संबंधित लेख

लोकप्रिय