आंबेगाव (पुणे) : आपटी ता.आंबेगा या दुर्गम आदिवासी गावात ग्राम विकास समितीच्या पुढाकारातून ग्रंथालय सुरू करण्यात आले.
आपटी डोंगर दुर्गम भागात वसलेले आदिवासी गाव. जेथे अजूनही रस्त्याची, पाण्याची सुविधा व्यवस्थित पोहचली नाही. अशा या गावातील युवकांच्या ग्राम विकास समितीच्या पुढाकाराने नवीन ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे.
लोकसहभागातून जमा करण्यात आलेली पुस्तके सर्वांना वाचनासाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच ग्रंथालयाच्या बरोबरच सार्वजनिक वाचनालय ही सुरू करण्यात येणार असून त्यात ग्रामस्थांना, युवक – युवतींना व विद्यार्थ्यांना वाचनासाठी दररोजची वर्तमानपत्रे, विविध मासिके, त्रैमासिके, वार्षिक अंक हे वाचनासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
या ग्रंथालयासाठी विशेष सहकार्य ज्ञानदीप वाचन चळवळीचे महेश जगताप, रविंद्र वायाळ व विजय केंगले यांनी केले. तर शहीद राजगुरु ग्रंथालयाचे अशोक जोशी, राजु घोडे, अशोक पेकारी व आदिम संस्थेचे डॉ.अमोल वाघमारे, अनिल सुपे, अर्चना गवारी व आपटी गावातील देणगीदार व्यक्तींंनी याचे संयोजन केले.