Monday, December 9, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAlandi : आळंदीत कार्तिकी एकादशी, बुधवारी पुरातन रथातून माऊलींचा वैभवी रथोत्सव

Alandi : आळंदीत कार्तिकी एकादशी, बुधवारी पुरातन रथातून माऊलींचा वैभवी रथोत्सव

पांडुरंगरायांचे पादुकांचे वैभवी स्नान हरिनाम गजरात (Alandi)

लाखो भाविक आळंदीत दाखल

आळंदी / अर्जुन मेदनकर : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२९ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यातील कार्तिकी एकादशी उद्या मंगळवारी ( दि.२६ ) लाखो वैष्णव भाविकांच्या साक्षीने हरिनाम गजरात साजरी होत आहे. (Alandi)

बुधवारी ( दि.२७ ) श्री’चा रथोत्सव होत आहे. दरम्यान सोमवारी ( दि. २५ ) श्री पांडुरंगरायांचे पालखी सोहळ्यातील दिंडीची नगरप्रदक्षिणा व इंद्रायणी नदीत श्रीं पांडुरंगरायांचे पादुकांचेt वैभवी स्नान हरिनाम गजरात झाले. राज्यातून आलेल्या शेकडो दिंड्यानी मंदिर आणि नगरप्रदक्षिणा टाळ, विना ,मृदुंगाचा त्रिनाद करीत सोमवारी ( दि. २५ ) हरिनामाचे गजरात केली.

यावेळी भाविकांच्या गर्दीने तीर्थक्षेत्र अलंकापुरी स्नानास इंद्रायणी नदी काठ फुलला.
आळंदी कार्तिकी यात्रेस आलेल्या भाविक, वारक-यांचे हरिनाम गजराने भक्तीला उधान आलेले दिसले. व्यापा-यांनी रस्त्यांचे दुतर्फा आकर्षक दुकाने थाटली असून साहित्य खरेदीस भाविकांनी गर्दी करून साहित्य खरेदी केली.

यामुळे आळंदीला यात्रेचे स्वरूप आले. यावर्षी शहरात फुटपाथने रहदारीला अडथळा झाला नाही. भाविकांची सोय प्रभावी झाली. सोमवारी माउली मंदिरात श्रीना पवमान अभिषेक, दुधारती, भाविकांच्या महापूजा, भाविकांच्या दिंडीची मंदिर आणि नगर प्रदक्षिणा झाली.

त्यापूर्वी श्री’ना महानैवेद्य झाला. वीणा मंडपात ह.भ.प.गगुकाका शिरवळकर आणि ह.भ.प.धोंडोपंतदादा अत्रे यांच्या वतीने कीर्तन सेवा झाली. धुपारती नंतर ह.भ.प.वासकर महाराज आणि ह.भ.प.वाल्हेकर महाराज यांचे तर्फे कीर्तन सेवा हरीनाम गजरात झाली.

भाविकांनी शहरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या ज्ञानदान सोहळ्यातील कीर्तन, प्रवचनात श्रवण सुखाचा आनंद घेतला. यात्रेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा मंदिरासह परिसरात सुरु आहे. यास भाविक वारकरीही आनंदाने हजेरी लावत श्रवणसुखाचा आनंद घेताना दिसत आहेत. (Alandi)

दरम्यान श्री’चे पहाट पुजेची लगबग आळंदी मंदिरात दिवस भर सुरु असतानाची धावपळ साहित्याची जमवा जमव केल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. आळंदी देवस्थान तर्फे भाविक, वारकरी, नागरिक, तीर्थयात्री यांचे सेवेसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या वर्षी माऊली मंदिरासह इंद्रायणी नदी घाटावरील आकर्षक विद्युत रोषणाईने भाविकांचे लक्ष वेधले.

भाविकांसाठी दर्शनबारी, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे, थंडी व पावसापासून सुरक्षा उपाय योजना करण्यात आल्या. मंदिर परिसरातून सी.सी,टि.व्ही. कॅमे-याची दर्शन बारीसह सर्वत्र नजर घडणा-या घटनांवर हालचालीवर ठेवण्यात आली आहे. आरोग्य सेवेत सुसज्ज रुग्णवाहिका तैनात करून सेवेत सज्ज झाल्या आहेत.

पिंपरी पोलिस आयुक्तालयाचे आयुक्त कार्य क्षेत्र अंतर्गत कार्तिकी यात्रेच्या काळातील पोलिस बंदोबस्त तैनात केला असून यात भाविकांच्या सुरक्षेस प्राधान्य देण्यात आले आहे. माऊली मंदिरास भेट देऊन वेळोवेळी पोलीस अधिकारी यांनी यात्रेचा आढावा घेतल्याचे आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी सांगितले.

कार्तिकी यात्रे सेवा सुविधा देण्यास पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, देवस्थांनचे व्यवस्थापक माऊली वीर, आळंदी देवस्थान, आळंदी नगरपरिषद, आरोग्य सेवा, महसूल व पोलिस प्रशासन परिश्रम घेत आहे.

आळंदी येथील अखंड हरिनाम सप्ताहात दिलीप महाराज ठाकरे यांचे कीर्तन झाले. यावेळी ठाकरे महाराज यांनी समाज प्रबोधन करून स्वच्छता, आरोग्य शिक्षण व स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी तसेच शेतकऱ्यानी आत्महत्या न करण्यासाठी जनजागृती करीत कीर्तन सेवा रुजू करण्यात आली.

भाविकांसह मंदिराच्या सुरक्षेसाठी प्रभावी नियोजन करण्यात आले आहे. यासाठी नियोजनपूर्व बैठकीत मागणी प्रमाणे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. देवस्थान कमिटी, पुणे जिल्हा पोलिस, महसुल, वीज वितरण, आरोग्य सेवा, पालिका प्रशासन यांची यासाठी मदत घेण्यात आली. आळंदी कार्तिकी यात्रेत विविध खात्या अंतर्गत समन्वय साधून यात्रा नियोजन करण्यात आल्याने भाविकांना विविध नागरी सेवा सुविधा देण्यात प्रशासनास यश आले. (Alandi)

पुणे जिल्हाधिकारी यांचे नियंत्रणात यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक्ष आळंदीत प्रांत, तहसीलदार, आळंदी मंडलाधिकारी राजेंद्र वाघ , आळंदी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचे माध्यमातून सेवक, कर्मचारी सेवेत तैनात करण्यात आले असून यात्रा सुरक्षित शांततेत व्हावी यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

श्रींचे पहाट पुजेसाठी निमंत्रितांना श्री हनुमान दरवाजाने त्यानंतर भाविकाना दर्शनास नवीन दर्शनबारीसह पानदरवाजाने, पास धारकाना हरिहरेंद्र स्वामी मठा समोरील देवस्थानच्या जिन्यातून मंदिरात दर्शनास प्रवेश देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.

भाविकाना श्री’चे दर्शना नंतर मुख्य महाद्वारातून बाहेर सोडण्यात येत आहे. दर्शनबारीतुन भक्ती सोपान पूल मार्गे मंदिरात हरिनाम गजरात प्रवेश करीत लाखो भाविकांनी हरीनाम गजर करत श्री’चे दर्शन घेतले. दर्शनबारी नदी पलीकडील बारीक गेली आहे, भाविकांना दर्शनास सुमारे तीन तासावर वेळ लागला. हजारो महापूजा या दोन दिवसात झाल्या.

दर्शनबारीतून भाविक मंदिरात प्रवेशताना डोअर फ्रेंम मेटल डीटेंक्टर मधून सोडण्यात येत होते. यातून मंदिरासह भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली. द्वादशीला ( दि. २७ ) महापूजा पासधाकाना महापूजा मंडपातून पुढे सोडण्यात येणार आहे.

श्रीचे दर्शनास सोडण्यात येणार आहे. यासाठी इंद्रायणी नदी घाटावर देवस्थानचे वतीने मंडप उभारण्यात आला आहे.

भाविकाना दर्शनबारीत सी.सी,टि.व्ही.यंत्रणेतून श्रीचे दर्शन होण्यासाठी प्रभावी काळजी यावर्षी देखील घेण्यात आली. पिण्यासाठी दर्शन बारीत पाण्याची सोय संस्थानने तसेच आर्ट ऑफ लिविंग चे साधक सेवकांच्या माध्यमातून प्रभावी करण्यात आली आहे.

आळंदी मंदिरातील श्री”चे कळस शिखर, सिद्धेश्वर महाराज मंदिर, विना मंडप, नागापूरकर मंडप, गणेश मंदिर, मुक्ताई मंदिर, अजानबाग प्राकार, श्रीचा मंदिर गाभारा, महाद्वार परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई आणि लक्षवेधी पुष्प सजावट भाविकांचे लक्षवेधी ठरली.

भाविकांची कार्तिकी यात्रा दरम्यान गैरसोय होवू नये यासाठी प्रांताधिकारी यांचे मार्गदर्शना नुसार झालेल्या सुचना आदेशा प्रमाणे विविध शासकीय खात्याचे अधिकारी कर्मचारी काम करताना त्याचा दिवसभर राबता दिसून येत होता. पोलिस आणि महसूल, आळंदी नगरपरिषद प्रशासन यात्रेस आलेल्या भाविकांच्या स्वागतास सज्ज असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.

आळंदी मंदिरात प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त भावार्थ देखणे, योगी निरंजन नाथसाहेब यांचे मार्गदर्शन आणि नियंत्रणात मंदिराचे प्रथा परंपरांचे पालन करीत आळंदी कार्तिकी यात्रा अंतर्गत श्रींचे संजीवन समाधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. आळंदी देवस्थान भाविकांचे स्वागतास सज्ज असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर. तुकाराम माने यांनी सांगितले. (Alandi)

आळंदी नगरपरिषद आणि आळंदी देवस्थान यांचे माध्यमातून यात्रेचे नियोजन वेळोवेळी जाहीर केलेल्या नियोजना प्रमाणे झाले आहे. भाविकांना विविध सेवा देण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. आळंदी मंदिरातील दर्शनबारी भरल्याने नदीचे भक्ति सोपान पुलाचे दर्शनबारी कडे भाविकांची बारी गेली.

यावर्षी श्रींचे समाधी स्पर्श दर्शन असल्याने कमी वेळेत जास्त भाविक दर्शन घेवून लवकर बाहेर येतील अशी व्यवस्था देवस्थानने केल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.

आळंदी यात्रा काळात पिण्याचे पाणी पुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी नगरपरिषदेने महावितरणचे माध्यमातून समनव्यातुन उपाय योजना केल्या आहेत. वीज पुरवठा खंडित होऊ नये साठी देखील काळजी घेण्यात आली आहे. दरम्यान टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा देखील सुरु ठेवण्यात आला आहे.

आज आळंदीत कार्तिकी एकादशीआळंदी कार्तिकी यात्रेतील भागवत एकादशी मंगळवारी ( दि. २६ ) साजरी होत आहे. यानिमित्त माऊली मंदिरात पहाट पूजेत श्रींचा पवमान अभिषेक, दुधारती, ११ ब्रम्हवृंदांचा वेदमंत्रजय घोष होणार आहे.

श्रीना महानैवेद्य, श्रींचे पालखीची नगरप्रदक्षिणा होणार आहे. श्रींचे दर्शन व मंदिरात धुपारती व परंपरेने संतोष मोझे यांचे वतीने जागर होणार आहे. द्वादशी दिनी बुधवारी ( दि. २७ ) श्रींचा आळंदीत रथोत्सव होणार आहे.

दरम्यान भाविकांचे स्वागताची मंदिरात तयारी पूर्ण झाल्याचे विश्वस्त योगी निरंजननाथजी यांनी सांगितले. यावर्षी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांचे मागणी नुसार पुरातन १५० वर्षांचे पूर्वीचा तसेच श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज यांनी खास सिसम लाकडा पासून बनविलेला २३ फूट उंच वैभवी रथोत्सव आळंदीत सोहळ्याचे खास आकर्षण आहे. यासाठी तयारी देखील पुरं करण्यात आली आहे. (Alandi)

आळंदीला भक्त निवासाची गरज

आळंदीतील कार्तिकी निमित्त चाकण चौक येथील शाळेच्या मैदानावर तसेच नदी परिसरातील मोकळ्या जागांवर भाविकांनी राहुट्या उभारून निवारा व्यवस्था केली आहे. कार्तिकी यात्रा अनुदान आणि राज्य तीर्थक्षेत्र निधीतून भाविकांसाठी विकास आराखड्यातील राखीव जागेत भक्त निवासाची व्यवस्था करण्याची मागणी आळंदी ग्रामस्थ ज्ञानेश्वर घुंडरे पाटील यांनी केली आहे.

मंदिर परिसरात धोकादायक इमारती वापरास यात्रा काळात बंद ठेवण्यात आल्या आहेत. या इमारतींना देखभाल दुरूस्ती करण्यास परवानगी देण्याची गरज असताना मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. संत साहित्याने दुकाने बहरली आहेत, यात्रेत भाविकांना तुळशीचे माळा, वारकरी संत साहित्यादी उपलब्ध झाले आहे.

माऊली मंदिरात वारकऱ्यांना मोफत औषध वाटप विविध सेवा भावी संस्थांच्या माध्यमातून सुरु झाले आहे. वारकऱ्यांच्या बंदोबस्तासाठी माऊली मंदिरात पोलीस सुरक्षेस तैनात करण्यात आले आहेत. मंदिरात प्रसाद वाटप सुरू आहे. महिला व पुरुष सेवक स्वकामचे सेवा मंडळाचे स्वयंसेवक अध्यक्ष सुनील तापकिर यांचे नियंत्रणात सेवा देत आहेत. माऊली भक्तांना खिचडी वाटपास सेवारत झाले आहेत. झाडी बाजारात प्रसाद पेढे व माळेंची दुकाने थाटली असल्याने लक्षवेधी दिसत आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय