Sunday, December 8, 2024
Homeग्रामीणअजित पवारांना हवे असलेले 'राजकीय ध्रुवीकरण' महाराष्ट्राच्या हिताचे नाही - डॉ. संजय...

अजित पवारांना हवे असलेले ‘राजकीय ध्रुवीकरण’ महाराष्ट्राच्या हिताचे नाही – डॉ. संजय दाभाडे

पुणे अजित पवारांना हवे असलेले ‘राजकीय ध्रुवीकरण’ महाराष्ट्राच्या हिताचे नाही, अशी टिका आरक्षण हक्क समितीचे निमंत्रक डॉ. संजय दाभाडे यांनी केली आहे.

डॉ. दाभाडे म्हणाले की, पदोन्नतीतील आरक्षणात आधीच्या फडणवीस सरकारने व आताच्या ठाकरे – पवार सरकारने अक्षम्य चालढकल केलीय हे स्पष्टच आहे. सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील न देणे , नागराज केस नुसार नोकरीतील अपूर्ण प्रतिनिधित्व ह्याबाबत कमिट्या नेमूनही त्या कमिट्यांच्या कडून काम करून न घेणे, सर्वोच्च न्यायालयाच्या २०१८ च्या अंतरिम आदेशाचे व केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन न करणे व त्यानुसार पदोन्नतीत आरक्षण सुरु करणे शक्य असूनही तसे न करणे ह्या गोष्टी दोन्ही सरकारांनी केलेल्या आहेत व राज्यातील हज्जारो मागासवर्गीयांना पदोन्नतीचे हक्क दोघं सरकारांनी हिरावून घेतले आहेत. 

कर्नाटक मध्ये दोन वर्षांपूर्वीच पदोन्नतीत आरक्षण सुरु झाले, परंतु महाराष्ट्रात मात्र त्याकडे अजूनही संपुर्णपणे कानाडोळा सुरु आहे.

ऑक्टोबर 2020 मध्ये पदोन्नतीत आरक्षणासाठी अजित पवारांच्या अध्यक्षते खाली मंत्री गट नेमला गेला. परंतु त्यांनी काहीच दिवे लावले नाहीत व उलटसुलट शासन निर्णय मात्र मंत्री गटाला बाजूला सारून काढले गेले. आताही ७ मे च्या जी.आर. बाबत मागासवर्गीयांत तीव्र असंतोष असतांना त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. किंबहुना ‘ह्यांना काहीही करू द्यात मी दखल घेत नाही’, असा संदेश पद्धतशीरपणे जाईल ह्याची पुरेपूर काळजी अजित पवारांनी घेतली असें दिसते. त्यांची हि बेपर्वाई काहीशी अनपेक्षित आहे, असल्याचे डॉ. दाभाडे यांनी म्हटले आहे.

मंत्री गटाच्या उपसमितीच्या बैठकीत वाद झाल्याचे माध्यमांतून कळले. परंतु प्रत्यक्षात जी.आर. मागे घेतला गेलेला नाही हेच स्पष्ट झाले आहे. एकंदरीत असे दिसतेय कि मागासवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचे अजित पवारांनी जाणीवपूर्वक ठरवले असावे. हा असा निर्णय त्यांनी विचार करून घेतला असावा असा निष्कर्ष काढला तर वावगे ठरणार नाही, असेही ते म्हणाले.

मराठा बांधवांना अजित पवार असा संदेश देऊ इच्छिताहेत कि ते मराठा बांधवांच्या हितासाठी मागासवर्गाला दुखवायला तयार आहेत. मराठा समाज पाठीशी उभा राहिला तरी आपले राजकारण पुढे जाईल व मागासवर्गीयांच्या मतांची आपणाला गरज नाही, असा संदेश अजित पवार देत असावेत असे दिसते, असाही आरोप करण्यात आला आहे.

ज्याप्रकारे भाजप मुसलमान सामाजा बाबत भूमिका घेत मुसलमानांची जराही पर्वा करत नाही व त्यातून हिंदू मतांचे ध्रुवीकरण करते त्याच प्रमाणे अजित पवारांनाही मराठा बांधवांचे राजकीय ध्रुवीकरण करावयाचे असावे व त्यासाठी ते मागासवर्गीयांना व त्यांच्या नेत्यांना काडीचीही किंमत देत नाहीत असे दिसत असल्याचा गंभीर आरोप डॉ। दाभाडे यांनी केला आहे.

महाराष्ट्राचे नेते होण्यापेक्षा मराठा समाजाचे नेतृत्व केले तरी पुरे असे अजित पवारांना वाटत असावे. राजकीय दृष्ट्या ह्या धृविकरणाचे काय परिणाम होतील ते माहित नाही परंतु सामाजिक दृष्ट्या असे ध्रुवीकरण महाराष्ट्राच्या हिताचे नाही व सामाजिक सलोख्यासाठी तर ते अधिकच धोकेदायक ठरू शकेल. राजकीय धृविकरणातून कुणाचा राजकीय फायदा होईल कदाचित परंतु सामाजिक दृष्ट्या ते काळजीत टाकणारे आहे असे वाटते. अजित पवारांचे असे राजकारण महाराष्ट्राच्या हिताचे नाही हे कोण लक्षात घेईल …..? असा सवालही केला आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय