मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाचा आज दुसरा व शेवटचा दिवस होता. आज विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला. १६४ विरुद्ध ९९ अशी मतांनी विश्वासदर्शक ठराव पार पडला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषण करताना आज एक मोठी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी इंधनावरील (fuel) व्हॅट लवकरच कमी करू, कॅबिनेटमध्ये असा निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती वाढल्या. त्यानंतर पंतप्रधानांनी इंधनावरील केंद्रीय कर कमी केला होता. इतर काही राज्यांनीही व्हॅट कमी केला होता. आता पुन्हा एकदा इंधनावरील कर कमी करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यासंदर्भात लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
तसेच, राज्यात सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे बळीराजा. बांधावर जाऊन सर्वच लोकं विचारपूस करत असतात. त्याच्या जीवनात सुखाचे दिवस यावेत. यासाठी प्रयत्न करतात. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार केला. यासाठी सर्वांच योगदान लागेल. केंद्राच्या मदतीनं राज्याला प्रगतीकडं नेऊ, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
रायगड किल्ला ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. हिरकणी या गावानं इतिहास घडविला. हिरकणी गावाच्या विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी शासनाच्या माध्यमातून देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.