Friday, April 19, 2024
Homeजिल्हाआदिवासी, दलित, वंचितांना न्याय हक्कांसाठी लढण्याशिवाय तरणोपाय नाही – ॲड.नाथा शिंगाडे

आदिवासी, दलित, वंचितांना न्याय हक्कांसाठी लढण्याशिवाय तरणोपाय नाही – ॲड.नाथा शिंगाडे

ठाकर समाजातील १०५ विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वाटप

१० फेब्रुवारी रोजी नंदुरबार येथे भव्य मोर्चा

सुदुंबरे (मावळ) : स्वातंत्र्याचा ७५ अमृतमहोत्सवी साजरा करत असताना आजही एका समाजाला आपली ओळख सिध्द करण्यासाठी लढावे लागत आहे, ही मोठी शोकांतिका आहे. लाल बावट्याच्या संघर्षामुळे आदिवासी ठाकर समाजातील मुलांना जातीचे दाखले आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मिळत आहेत. हे चळवळीच्या सातत्याने केलेल्या संघर्षाचे यश आहे. त्यामुळे आदिवासी, दलित, वंचितांना न्याय हक्कांसाठी लढण्याशिवाय तरणोपाय नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.नाथा शिंगाडे यांनी केले.

सुदुंबरे (ता. मावळ) येथे अखिल भारतीय किसान सभा, जनवादी महिला संघटना आणि वडगाव मावळ तहसीलद प्रशासन यांच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या दिमाखात करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी मावळ चे नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गणेश दराडे, सिटू कामगार संघटनेचे जिल्हा सचिव वसंत पवार, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव नवनाथ मोरे, डीवायएफआय चे ॲड.अमिन शेख, किसान सभेचे जिल्हा कमिटी सदस्य बाळासाहेब शिंदे, जनवादी महिला संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा अपर्णा दराडे, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाळासाहेब देशमुख, दादाभाऊ जाधव, मिराताई भांगे, प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव कराळे, जांबुवडे ग्रामपंचायत सदस्य स्वातीताई शिंदे व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक करताना गणेश दराडे म्हणाले, किसान सभा, जनवादी महिला संघटना, ग्रामस्थ यांण्या दिड वर्षाच्या संघर्षातून ठाकर समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले मिळाले आहेत. लढाई संपलेली नाही, आपल्या प्रश्नांसाठी संघर्ष चालूच ठेवणे गरजेचे आहे, असेही दराडे म्हणाले.

यावेळी बोलताना नायब तहसीलदार रावसाहेब चाटे म्हणाले, संघटनेचा संघर्ष आणि प्रशासनाच्या समन्वयातून हे दाखले मिळाले आहेत. येणाऱ्या काळात आदिवासी समाजातील आणि वंचित घटकातील नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन नेहमी तत्पर असेल. 

यावेळी वसंत पवार म्हणाले, फक्त जातीचे दाखलांचा संघर्ष करून आपल्याला थांबायचे नाही, आपल्याला जातवैधता प्रमाणासाठी आणि पायाभूत सुविधांसाठी सर्वांची एकजूट काय ठेवावी लागेल.

तसेच नवनाथ मोरे म्हणाले, आज सगळ्याच क्षेत्रात खाजगीकरण होत असताना रोजगाराच्या संधी हिरावून घेतल्या जात आहेत. एकीकडे आदिवासींना जातीचे दाखले मिळत नाहीत तर दुसरीकडे आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगसांची घुसखोरी सुरू आहे. यामुळे आदिवासींना भारतीय संविधानाने दिलेला हक्काच हिरावून घेतला जात आहे. या विरोधात १० फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांना जाब विचारण्यासाठी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाच्या वतीने जवाब दो मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्येही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही नवनाथ मोरे म्हणाले. यावेळी बाळासाहेब शिंदे, अपर्णा दराडे, स्वातीताई शिंदे आदींनी उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात अर्चना जाधव, सोनाली मेंढाळे, पायल जाधव, दिव्या मेंढाळे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी आकाश गावडे, सचिन देसाई दवलत शिंगटे, नामदेव सूर्यवंशी, पावसू करे, नंदा शिंदे आदींसह उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संयोजन अंजना खांदवे, जनाबाई जाधव, बायडाबाई मेंढाळे, मीरा भांगे, सोनाली जाधव, रामदास भांगे, सोमनाथ जाधव, महादू पारधी, सोपं खांदवे, रामदास मेंढाळे, पांगू गावडे, कैलास मेंढाळे, रामदास पारधी, अनिता जाधव, मनिषा जाधव, ताई मेंढाळे यांच्या ग्रामस्थांनी केले होते.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय