डहाणू : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या प्रकरणी केंद्र सरकार इतकी तत्परता दाखवते, मग दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत का नाही? असा सवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी केला आहे.
यावेळी आमदार निकोले म्हणाले की, अभिनेता सुशांत सिंह राजपुत यांची आत्महत्या की हत्या हे गूढ अजून कायम असून पोलीस, मिडीया यावर जोरदार चर्चा करताना दिसत आहेत. पण, मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते, अघोरी सामाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी कार्य करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर, महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे, कन्नड विचारवंत आणि लेखक प्रा. एम. एम. कलबुर्गी, हिंदुत्त्ववादी आणि जातीयवादी विचारांच्या संघटनांच्या विरुध्द आवाज उठवून सर्वच धर्मांध शक्तींवर टीका करणाऱ्या निर्भीड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या हे आपण सर्वजण जाणतो व यांच्या हत्येचा तपास हा सीबीआय कडेच गेल्या काही वर्षांपासून आहे. त्यांच्या हत्या होऊन बराच काळ गेला तरी अजून त्यांचे हत्यारे व त्यामागील सूत्रधार सीबीआय ला का सापडत नाहीत? त्यांच्यावर कडक कारवाई अजून का होत नाही? यामागे काय गौडबंगाल आहे? असे रास्त प्रश्न आमदार विनोद निकोले यांनी केंद्र सरकारला केले आहेत.
दरम्यान माकपचे केंद्रीय कमिटी सदस्य डॉ. अशोक ढवळे म्हणाले की, मुक्त, सक्षम, निष्पक्ष आणि जलद तपास ही काळाची गरज आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला ७ वर्षे होऊनही सीबीआयसारख्या तपास यंत्रणेकडून अजूनही तपास पूर्ण न होणे ही वेदनादायी बाब आहे. सुशांत सिंह यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी लोकशाहीचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मग, लोकशाही टिकावी म्हणून ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या खुनाचा तपास पूर्ण होईल आणि दोषीना व त्यातील सूत्रधारांना कठोर शिक्षा दिली जाईल तेव्हाच लोकशाहीचा खरा विजय होईल असे डॉ. अशोक ढवळे म्हणाले.