हिंगणघाट : हिंगणघाट येथे प्राध्यापिकेवर एकतर्फी प्रेमातून अंगावर पेट्रोल ओतून जिवंत पेटवणारा धक्कादायक प्रकार दोन वर्षापुर्वी घडला होता, या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले होते. अखेर न्यायालयाने आपला निकाल दिला आहे.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे ३ फेब्रुवारी २०२० रोजी प्रा. अंकिता पिसुड्डेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत पेटविले होते, मृत्यूशी झू़ंज देत असलेल्या अंकिताचा १० फेब्रुवारी २०२० ला मृत्यू झाला होता, या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास केला. हिंगणघाट न्यायालयात प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर बुधवारी ९ फेब्रुवारीला न्यायालयाने आरोपी विकेश नगराळेला दोषी ठरवले होते.
या जळीतकांड प्रकरणी आरोपी विकेश नगराळे याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पुण्यतिथीच्या दिवशी कोर्टाने निकाल दिल्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.
आरोपी विकेश नगराळे याला मृत्यूदंड द्यावा अशी शिक्षेची मागणी करण्यात आली होती. तर आरोपीतर्फे त्याचे लग्न झाले आहे त्याला दया दाखवावी असे सांगण्यात आले होते.
काय आहे प्रकरण
हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिकेवर नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जातांना आरोपी विकेश नगराळेने पेट्रोल तिच्यावर ओतले आणि तिला पेटवून टाकले. यात गंभीररित्या भाजलेल्या पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र 10 फेब्रुवारीला उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात शासनाने उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती.