वारणानगर : येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य मल्लखांब हौशी संघटना, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि जी -२० परिषद निमित्ताने “मल्लखांब देशी खेळ “या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातून २०० हून अधिक खेळ – क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, खेळाडू, मार्गदर्शकांनी सहभाग नोंदविला. वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे- सावकर, प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. वासंती रासम यांनी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानी संयोजक व प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते. क्रीडा संचालक प्रा. अण्णासो पाटील समन्वयक संयोजक होते. डॉ. एस. एस. खोत, डॉ. संतोष जांभळे यांनी संयोजन सहाय्य केले.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे गुजरात येथील मल्लखांब चे प्रसिद्ध अभ्यासक राहुल चोक्सी म्हणाले की, “मल्लखांब खेळ प्राचीन असून त्याला एक परंपरां आहे. देश- विदेशात मल्लखांब खेळाने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. खेळाडूंनी खांबावर संतुलन राखणे, लटकने लाकडी खांब पकडणे, क्षमता आणि ताकद विकसित करणे या खेळात महत्त्वाचे”, असल्याचेही ते म्हणाले. पाॅन्डेचेरी येथील डाॅ. के. गणेशन खेळाबद्दल माहिती सांगताना म्हणाले की,”मल्लखांब खेळांने जागतिक क्रमवारीत महत्त्वाचे स्थान प्राप्त केले असून मल्लखांब हा एक व्यायाम प्रकार व कसरतीचा खेळ आहे. कुस्तीला पूरक असणारा हा खेळ आज जगभर खेळला जात आहे.”
मुंबई येथील प्रा. गणेश देवरुखकर म्हणाले की,”मल्लखांब खेळाचा उंच उडी, कुस्ती, बांबू उडी, खो-खो इत्यादी खेळ प्रकारात खेळाडूंना मोठा फायदा होतो. पूर्वीच्या काळी हा खेळ सैनिक युद्धाच्या अगोदर खेळायचे, कारण यामुळे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त व्यायाम होतो. थोडक्यात लाकडी खांबाच्या साह्याने योगासन करणे म्हणजे मल्लखांब खेळ प्रकार आहे.” प्रारंभी स्वागत प्रास्ताविक आणि मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले की,”वारणानगरी मधील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाने मल्लखांब खेळ प्रकारात सलग ३६ वर्षे शिवाजी विद्यापीठाची प्रतिष्ठेची आर. पी पोवार मल्लखांब ट्रॉफी महाविद्यालयाकडे कायम ठेवली आहे.
शारीरिक तंदुरुस्ती आणि मनाच्या एकाग्रतेसाठी मल्लखांब शिक्षण आवश्यक आहे. प्राचीन भारतीय मार्शल आर्ट प्रकारात हा खेळ मोडत असून आजच्या क्रीडा विश्वात पारंपारिक खेळ म्हणून मलखांब चे एक वेगळे अस्तित्व आहे. साधारण १३ व्या शतकापासून हा महाराष्ट्रात आणि देशभर खेळला जाणारा क्रीडा प्रकार आहे. खेळाडूला चपळता आणि लवचिकता गुणांनी परिपूर्ण करणाऱा हा खेळ प्रकार”, असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रारंभी स्वागत प्रास्ताविक प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी केले. तंत्रसाह्य डॉ.एस. एस. खोत आणि डॉ. संतोष जांभळे यांनी केले. क्रीडा संचालक प्रा. आण्णासो पाटील यांनी आभार मानले.