Tuesday, January 21, 2025

वावर येथील शोकसभेत माकपचे ज्येष्ठ नेते कॉ. रतन बुधर यांना भावपूर्ण आदरांजली !

माकपचे ९४ वर्षीय नेते एल. बी. धनगर शोकसभेत संबोधित करताना.. 


जव्हार
 : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते  कॉम्रेड रतन बुधर यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात ‘वावर’ या गावी शोकसभा संपन्न झाली. यावेळी रतन सुंदर यांनी गेली ५० वर्षे लाल बावट्याचे केलेले अथक कार्य जास्त जोमाने पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला. 

या शोकसभेस ९४ वर्षीय माकपचे ज्येष्ठ नेते कॉ. एल. बी. धनगर हे केंद्रीय कमिटी सदस्य डॉ अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावीत व मरियम ढवळे, राज्य कमिटी सदस्य आमदार विनोद निकोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा आणि अपर जिल्हाधिकारी यांनी संबोधित केले.

माकपचे ज्येष्ठ नेते रतन बुधर

रतन बुधर कोण आहेत ?

रतन बुधर हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य कमिटी सदस्य, ठाणे-पालघर जिल्हा सचिवमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे उपाध्यक्ष आणि ठाणे-पालघर जिल्हा किसान सभेचे होते.

कॉ. रतन बुधर हे गेली सुमारे ५० वर्षे माकपचे अत्यंत लढाऊ व निष्ठावंत नेते होते. अत्यंत लहान वयात असताना ते कॉ. मंगळ्या भोगाडे या ज्येष्ठ पक्षनेत्यांच्या तालमीत तयार झाले आणि त्यांच्यासोबत पक्षाची व किसान सभेची बांधणी करण्यासाठी ते संपूर्ण जव्हार व मोखाडा हे डोंगराळ अतिदुर्गम तालुके पायी फिरले. १९८६ – ८७ साली झालेल्या प्रचंड आंदोलनात ओझरखेड येथे झालेल्या पोलीस गोळीबारात कॉ. जान्या बुधर आणि कॉ. तुका ओझरे हे दोन कॉम्रेड शहीद झाले. 

माकपचे केंद्रीय कमिटी सदस्य डॉ.अशोक ढवळे शोकसभेत संबोधित करताना..

१९९२ साली जव्हार तालुक्यात कुपोषणामुळे झालेल्या बालमृत्युंच्या प्रकरणात पक्षाने कॉ. रतन बुधर यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या प्रचंड लढ्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना जव्हारला भेट द्यावी लागली आणि आदिवासी भागात कुपोषण रोखण्यासाठी अनेक नवीन योजना जाहीर कराव्या लागल्या. वनाधिकार कायद्याची आणि मनरेगाची अंमलबजावणी यावर अनेक जोरदार लढयांचे त्यांनी समर्थ नेतृत्व केले. जव्हार तालुक्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व जनसंघटनांचे ते आधारस्तंभ होते.

कॉ. रतन बुधर अनेक वर्षे त्यांच्या वावर गावचे सरपंच होते. पुढे ठाणे व नंतर पालघर जिल्हा परिषदेवर ते अनेकदा प्रचंड बहुमताने निवड झाली. ते काही वर्षे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचेही सदस्य होते. २०२० साली झालेल्या निवडणुकीत ते उमेदवार नसतानाही जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषदेची एक आणि पंचायत समितीची एक जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिंकली. स्वतः जवळ जवळ निरक्षर असतानाही त्यांनी जव्हार तालुक्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा गड बांधला आणि आपल्या अथक परिश्रमांच्या जोरावर अनेक दशके तो राखला, हे विशेष आहे. 

शोकसभेस मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदाय

कॉ. रतन बुधर यांच्या निधनानंतर २० डिसेंबर रोजी त्यांना मानवंदना देण्यासाठी संपूर्ण जव्हार शहर जनतेने उत्स्फूर्तपणे बंद ठेवले होते. 

आम्ही एक सच्चा कॉम्रेड गमवला – डॉ. अशोक ढवळे

कॉ. रतन बुधर गेल्या अनेक दशकांपासून माझे अत्यंत निकटचे कॉम्रेड आणि मित्र होते. त्यांनी कधीही आपली जबाबदारी टाळली नाही. ठाणे-पालघर जिल्ह्यात २००६ ते २००९ या कठीण काळात पक्षाला वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी इतर शेकडो कॉम्रेडस सोबत कॉ. रतन बुधर यांचा सिंहाचा वाटा होता हे कधीच विसरले जाणार नाही. आम्ही एक सच्चा कॉम्रेड गमवला आहे, यांचे अतिव दु:ख होत आहे, असे डॉ. अशोक ढवळे म्हणाले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles