Tuesday, January 21, 2025

स्कुटरवरून फटाके घेऊन जाताना भयंकर स्फोट, पितापुत्र जागीच ठार

पुद्दुचेरी : तामिळनाडूत स्कूटरवरून फटाके घेऊन जाताना फटाक्यांमुळे भयंकर स्फोट झाला, या स्फोटात पितासह त्यांच्या ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अरियानकुप्पम के कलैनेसन (३७) असे त्या वडिलांचे नाव होते. तर ७ वर्षांच्या मुलाचे नाव प्रदीश असे होते. हे दोघे फटाके खरेदी करून पुद्दुचेरीकडे निघाले होते. त्याच दरम्यान पुद्दुचेरी-वेल्लुपुरम सीमेवर असलेल्या कोट्टाकुप्पम शहरात स्कूटरमध्ये अचानक स्फोट घडला. ही संपूर्ण घटना येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

स्फोटानंतर १५ मीटर दूर फेकले गेले पोलिसांनी या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ जारी केला आहे. त्यामध्ये कलैनेसन स्कूटरवर जाताना दिसत होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा प्रदीश स्कूटरवरच फटाक्यांची बॅग पकडून बसला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोट्टाकुप्पम येथे घडलेला हा स्फोट इतका भयंकर होता की, दोघे १५ मीटर दूर फेकल्या गेले. या दुर्घटनेत इतर तीन जण गणेश, सय्यद अहमद आणि व्हीजी आनंद हे देखील जखमी झाले आहेत. त्या तिघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विल्लुपुरमचे पोलिस उप-महानिरीक्षक एम पांडियन आणि पोलिस अधीक्षक एन श्रीनाथ यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर कलैनेसनने ३ नोव्हेंबर रोजी दोन बॅगा भरून देसी फटाके विकत घेतले होते अशी माहिती समोर आली. हेच फटाके घेऊन तो आपल्या सासरवाडीला निघाला होता. दिवाळीच्या दिवशी तो कूनीमेदु येथून एक बॅग घेऊन पुद्दुचेरीच्या दिशेने निघाला होता. त्याच दिवशी ही घटना घडली.

फटाक्यांमध्ये उष्णतेने स्फोट घडला असावा असे प्रथमदृष्ट्या दिसून येत आहे. पोलिसांनी परिसरातून एक पोते भर फटाके जप्त केले आहेत. तसेच याबाबत भारतीय दंड विधान आणि स्फोटांबाबतच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles