Wednesday, April 24, 2024
Homeजुन्नरब्रेकिंग : देवळे व खैरे-खटकाळेच्या तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधात गुन्हा...

ब्रेकिंग : देवळे व खैरे-खटकाळेच्या तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधात गुन्हा दाखल

जुन्नर : आदिवासी भागातील देवळे व खैरे-खटकाळे ता.जुन्नर या दोन ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक व ग्राम कोष समिती अध्यक्ष यांनी २० लाख १५ हजार ४३० रुपयांचा अपहार केल्याचे दप्तर तपासणीत निष्पन्न झाले आहे.

जुन्नर तालुका पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अंकुश खांडेकर यांनी चौकशी अंती या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात कथित गैरव्यवहार प्रकरणी शुक्रवारी ता. २९ जुलै रोजी फिर्याद दाखल केली. या प्रकरणामुळे आदिवासी भागात एकच खळबळ उडाली आहे. विस्तार अधिकारी खांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार याप्रकरणी संशयित आरोपी देवळे येथील तत्कालीन ग्रामसेवक एम. के. ठोंगिरे रा.कोपरे व तत्कालीन सरपंच छगन घुटे रा. देवळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांवर देवळे ग्रामपंचायतीत सन २२ जून ते २८ जुलै २०१७ मध्ये संगनमताने ग्रामनिधी व १४ व्या वित्त आयोगाची ६ लाख ५१ हजार ७०० रूपये इतक्या रकमेच्या अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खैरे-खटकाळे ग्रामपंचायत मधील ग्रामनिधी व १४ व्या वित्त आयोगाची १३ लाख ६३ हजार ७३० रुपये इतकी रक्कम तत्कालीन ग्रामसेवक एम. के. ठोंगिरे रा. कोपरे व तत्कालीन सरपंच किसन पारू केदारी रा.खटकाळे यांच्यावर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ५ टक्के पेसा बंध निधी ४ लाख १९ हजार १०० रुपये च्या अपहार प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक एम.के. ठोंगिरे व तत्कालीन पेसा अध्यक्ष काळू चिंधा गागरे, रा. खटकाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक साळुंखे पुढील तपास करत आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय