पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि. १९ -स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सोमवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी हे पुरस्कार भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनीलजी देवधर यांच्या हस्ते आकुर्डी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे सायंकाळी ६:३० वाजता प्रदान केले जातील. या पुरस्कारांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार हा शुभान फाउंडेशन, मिझोराम आणि राज्यस्तरीय पुरस्कार स्वयंसिद्धा, कोल्हापूर या संस्थांना घोषित करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे दरवर्षी देण्यात येणारे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांचे हे १६ वे वर्ष असून राष्ट्रीय पुरस्कार सन्मानचिन्ह, ₹१,००,०००/- (रुपये एक लाख फक्त) आणि राज्यस्तरीय पुरस्कार सन्मानचिन्ह, ₹५१,०००/- (रुपये एकावन्न हजार फक्त) अशा स्वरूपाचे आहेत, अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्यावतीने देण्यात आली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणेच राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा व राष्ट्रसेवा हे व्रत घेऊन धर्मरक्षण, राष्ट्रहित, सेवा क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ देऊन मंडळातर्फे गौरविण्यात येते. यंदा स्वयंरोजगार आणि उद्योजकता विकास क्षेत्रात काम करणाऱ्यांना हे पुरस्कार संस्थेतर्फे जाहीर झाले आहेत. फुटीरतावाद आणि धर्मांतरणाच्या विळख्यात अडकलेल्या मिझोराम राज्यामध्ये स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी ‘शुभान फौंडेशन’ यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि तीन दशकांहून अधिक काळ ‘स्वयंसिद्धा’ संस्थेच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन, उद्योजकता, अन्यायनिवारण तसेच आरोग्यविषयक कार्य करीत असलेल्या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार प्रदान सोहळा सर्वांसाठी खुला असून सावरकरप्रेमींसह सर्व नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांनी केले आहे.