१. २७ टक्के विद्यार्थ्यांकडे नाहीत स्मार्टफोन, लॅपटॉप; कसं देणार ऑनलाईन शिक्षण ? NCERT चा सर्व्हे.
सरकार कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाबाबत आग्रही दिसतंय, मात्र प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळीच आहे. देशभरात २७ टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप अशी कुठलीही सुविधा नसल्याचं समोर आलंय. तर २८ टक्के विद्यार्थी आणि पालकांसमोर वीजेची समस्या प्रामुख्याने अडचण असल्याचं समोर आलंय. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने हा सर्व्हे केलाय.
एनसीईआरटीच्या या सर्व्हेक्षणात केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि सीबीएसईशी संबंधित शाळांचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक तसेच प्राचार्यांसह एकूण ३४००० लोकांनी सहभाग घेतला. यांचं म्हणणं आहे की, प्रभावी शैक्षणिक उद्देश्य प्राप्तीसाठी उपकरणांचा वापर करण्याच्या माहितीचा अभाव तसेच शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाच्या पद्धतीची पूर्ण माहिती नसल्याचे शिकवण्यात मोठ्या अडचणी निर्माण होता आहेत.
२. आता 31 ऑगस्टपर्यंत आयटीआयमध्ये प्रवेश.
आयटीआयची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी ही माहिती दिली. Https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावरुन विद्यार्थ्यांना माहिती मिळू शकेल. आवश्यक असल्यास, जवळच्या आयटीआय संस्थेशी संपर्क स्थापित करून आपण ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज करू शकता.
३. नवीन शिक्षण धोरण व्यवस्थापन अभ्यासक्रम मजबूत करेल.
डॉ. निशंक गुरुवारी अखिल भारतीय व्यवस्थापन असोसिएशनच्या २५ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. यामध्ये ते म्हणाले की व्यवस्थापन ही आपल्या प्राचीन सभ्यतेचा एक भाग आहे आणि अलीकडच्या काळात व्यवस्थापन शिक्षण आणि भारतीय व्यवसायात मोठा बदल झाला आहे. हे लक्षात घेऊन नवीन शिक्षण धोरण आणले गेले आहे. ते म्हणाले की, रामायण आणि महाभारत, वेद, श्रुती, स्मृती आणि पुराणातील प्राचीन महाकाव्ये आपल्याला व्यवस्थापनाचे महत्त्व शिकवतात.
४. डी. एल. एड. प्रथम वर्षाचे ऑनलाईन प्रवेश सुरू.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी डी. एल. एड. प्रथम वर्ष प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहेत. १७ ऑगस्ट पासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून याबाबत चे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या सूचना , प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयाची यादी राज्य शैक्षणीक संशोधन व परीक्षण परिषद , पुणे यांच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
५. बारा विद्याशाखेतील अभ्यासक्रमाना दूरशिक्षण किंवा मुक्तशिक्षणांद्वारे प्रवेश देता येणार नाही – युजीसी
व्यावसायिक अभ्यासक्रमातील अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुकला अश्या बारा विद्याशाखेतील अभ्यासक्रमांचे आणि एम.फिल., पीएचडी चे दूरशिक्षण किंवा मुक्तशिक्षणांद्वारे प्रवेश देता येणार नाही असे विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केले आहे. युजीसीने मुक्तशिक्षण किंवा दुरशिक्षणासाठी प्रतिबंधित अभ्यासक्रमाबाबतची माहिती परिपत्रकाद्वारे संकेतस्थळावर जाहीर केली आहे. युजीसीने २० टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यास यापूर्वीच परवानगी दिली आहे.
६. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी समिती.
केंद्राने नुकत्याच घोषित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विभागांतील शिक्षण तज्ञांचा आणि अभ्यासकांचा समावेश असलेली समिती नेमून या धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात व्यवस्थित विचार विनिमय करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. तसेच, नेहमी जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु होते मात्र सध्याचा काळ पाहता जानेवारी ते डिसेंबर असे शैक्षणिक वर्ष सुरु करता येते का त्याबाबत केंद्राशी विचारविनिमय करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
७. खिचडी शिजवून न देता विद्यार्थ्यांना शिधा स्वरूपात धान्य वाटप करण्यात येणार
कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरूच आहे . याच धर्तीवर सरकारने मध्यान्ह भोजन योजनेतील शालेय पोषण आहारही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे . यात खिचडी शिजवून न देता विद्यार्थ्यांना शिधा स्वरूपात धान्य वाटप करण्यात येणार आहे . जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांतील साठ दिवसांसाठी पहिली ते पाचवीपर्यंच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा किलो तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नऊ किलो तांदुळ मिळणार आहे . यासोबत खिचडी शिजवण्याच्या खर्चात धान्यादी मालाचे वाटप केले जाणार आहे . राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत .