नाशिक : नोकरी गमावलेल्या कामगारांना वेतन मिळण्यासाठी सेंटर टेंड युनियन केंद्र (सिटू) च्या मागणीला यश मिळाले आहे, असे सिटू राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले.
कोरोनामुळे लॉक डाउन झाल्यानंतर अनेक उद्योग व सेवा बंद करण्यात आले. त्यामुळे देशातील लाखो कामगारांचा रोजगार गेला. अशा बेरोजगार झालेल्या कामगारांना राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य देण्याची मागणी सीटू च्या वतीने देशाचे कामगार मंत्री संतोषी गंगवार यांच्याकडे १३ जून २०२० रोजी करण्यात आली होती. त्यानंतर सिटूच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील नोकरी गमावलेल्या ५७२ कामगारांचे अर्ज अटल विमीत व्यक्ती कल्याण योजनेअंतर्गत ईएस आयच्या शाखेकडे सादर करून आर्थिक सहाय्य देण्याची मागणी केली होती.
यासंदर्भात सीटूने राष्ट्रीय पातळीवर पाठपुरावा व आंदोलने केल्यानंतर २० ऑगस्ट २०२० रोजी ईएस आयसी कार्पोरेशन ची ऑनलाइन व्हिडिओ बैठक होऊन यावर निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार २१ मार्च ते ३१ डिसेंबर २०२० या काळात ईएसआयसी चे सभासद असलेला कामगार बेरोजगार झालेला असल्यास त्यास त्याच्या मागील सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्के वेतन तीन महिने देण्यात येणार आहे. यासाठी सदर कामगार ईएससायसीचा दोन वर्ष सभासद असला पाहिजे व त्याने कमीतकमी ७८ दिवसाचे ईएसआयसी ची वर्गणी भरलेली असली पाहिजे .
आज देशभरात ईएसआयसी चे साडेतीन कोटी कामगार सदस्य आहेत. ज्या कामगारांचे वेतन २१,००० दरमहा पेक्षा कमी आहे असे कामगार सदस्य असतात. सुमारे चाळीस लाख कामगारांना या योजनेचा फायदा मिळू शकतो.