पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : दि.२३ – “एखाद्या अत्यंत प्रिय व्यक्तीप्रमाणे आपल्या कवितेवर प्रेम करा अन् निर्भयपणे कविता सादर करा!” असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांनी ना. धों. महानोर साहित्यनगरी (जयगणेश बँक्वेट हॉल), नवीन देहू – आळंदी रस्ता, मोशी येथे इंद्रायणी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या दुसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनातील कविसंमेलनाच्या अध्यक्षीय मनोगतातून केले; आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे तीस कवींनी आपल्या रंगतदार कवितांनी कविसंमेलनाला मोरपंखी झळाळी प्राप्त करून दिली. संमेलनाध्यक्ष सोपान खुडे, इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर, समन्वयक अरुण बोऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रेम, निसर्ग, राजकारण, समाजकारण या विषयांना स्पर्श करणाऱ्या गीत, गझल, विडंबन, भजन, मुक्तच्छंद अशा विविध काव्यप्रकारांचा आविष्कार करीत कवींनी रसिकांची मने जिंकून दाद मिळवली. अरुण कांबळे, चेतना कड, हेमंत जोशी, रामराव गायकवाड, संजय देशमुख, योगिता कोठेकर, श्रुती वाकडकर, योगेश इरोळे, संतोष चव्हाण, संजय गगे, चंद्रकांत मिरगे, तुळशीदास ढवळे, नंदकुमार कांबळे, महादेव कोरे, सविता इंगळे, आदेश कोरेकर, परिमल भाटे, किशोर सुगंधे, शुभांगी झरेकर, पुरुषोत्तम हिंगणकर, प्रा. भास्कर घोडके, प्रतिमा काळे, शांताराम सोनार, राजेंद्र घावटे, रजनी अहेरराव, विवेक मस्के, ॲड. रमेश उमरगे, महेश कुलकर्णी, राजेंद्र भोसले या सहभागी कवींना स्वागताध्यक्ष गणेश सस्ते यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि मानाची शाल प्रदान करून सन्मानित करण्यात आले. इंद्रायणी साहित्य परिषदेच्या कार्यकारिणी सदस्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी आभार मानले.