कराड (सातारा) : पुण्यानंतर सर्वात मोठे शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कराड शहरवासीयांना विद्यार्थ्यांची ओढ लागली आहे. कराड शहराची निम्म्याहून जास्त अर्थव्यवस्था विविध शैक्षणिक संस्था आणि त्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे.
अभियांत्रिकी, कृषी, माहिती तंत्रज्ञान, कला, साहित्य, संस्कृती, तंत्रज्ञान, फार्मसी, मेडिकल सायन्स, कॉमर्स, व्यवस्थापन, पॉलिटेक्निक, जीवशास्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, औषधनिर्माण, टेलिकम्युनिकेशन इ. विविध प्रकारचे आधुनिक शिक्षण देणाऱ्या शेकडो सरकारी आणि खाजगी शिक्षण संस्था कराड शहर आणि तालुका परिसरात आहेत.
परदेशी आणि देशातील विविध राज्यातून शिक्षणासाठी आलेले हजारो विद्यार्थी येथे शासकीय वसतिगृह आणि खाजगी निवासात राहतात.
कोयना आणि कृष्णा नदीच्या तीरावर असलेल्या प्रीतिसंगम घाट आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती स्थळाचे रोज दर्शन घेणाऱ्यांची संख्या उल्लेखनीय असते. कराड शहर, मलकापूर, ओगलेवाडी, बनवडी, विद्यानगर येथील बाजारपेठ आणि आर्थिक उलाढाल शिक्षण संस्था बंद असल्यामुळे थांबलेली आहे.
शहरातील अनेक गरजू महिला पोळीभाजी सेंटर, घरगुती खानावळी, स्नॅक सेंटर, वडापाव, सामोसा सेंटर इ. व्यवसाय करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. आईस्क्रीम पार्लर, लॉन्ड्री, केशकर्तनालय इ. वर अवलंबून असलेल्या हजारो व्यावसायिकांची अर्थव्यवस्था कोसळली आहे.
सात महिन्यांचा लॉकडाऊन सहन केलेले कराड शहर पुन्हा शिक्षण संस्था चालू व्हाव्यात, म्हणून सरकारकडे मोठ्या अपेक्षेने पहात आहे. विद्यार्थ्यानो आम्ही तुमच्या आगमनाची वाट पहात आहोत, अशा कराड वासीयांच्या भावना आहेत.