पुणे : संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर ते पुढे काय करणार? असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता, अखेर आज संभाजीराजे यांनी पुण्यात पत्रकार परीषद घेत मोठी घोषणा केली आहे.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. आपण भाजपमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट करत संभाजीराजेंनी आज ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना केल्याची घोषणा केली. स्वराज्य ही संघटना उद्या राजकीय पक्ष झाला तरी वावगे ठरु नये असेही ते म्हणाले. तसेच राज्यसभेची निवडणूक ही अपक्ष लढवणार असल्याचे संभाजीराजेंनी जाहिर केले. मराठा समाजाला एका छताखाली आणण्यासाठी ही संघटना स्थापन केल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले आहे. लोकांना स्वराज्याच्या नावाखाली एकत्र करण्यासाठी ते लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे.
पुढे ते म्हणाले कि, यावर्षीची राज्यसभा निवडणूक मी लढवणार आहे. परंतु कुठल्या पक्षात जाणार हा प्रश्न आहे. मी कोणत्या पक्षाचा सदस्य नाही. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. माझा कार्यकाळ संपला असल्यामुळे माझे योगदानाची दखल घेऊन सर्व पक्षीय नेत्यांना माझी विनंती आहे राज्यसभेवर पाठवाव असे आवाहन त्यांनी केले. तसेच, माझी कार्यपद्धती पाहिली असेल तर राजकारण विरहीत समाजाला दिशा देण्यासाठी आहे. मी कधी पाहिले नाही याचा फायदा कोणाला होईल, नेहमी समाजाचे हित पाहिले आहे, असे ते म्हणाले.