Wednesday, February 5, 2025

तीर्थक्षेत्र तहानलेलेच : आळंदीला शुद्ध पाणी कोण देणार ?

आळंदी : आळंदीच्या पाणी प्रश्नावर चर्चा, बैठका भरपूर झाल्या. पिंपरी-चिंचवडच्या चिखली, तळवडे हद्दीतून पिंपरी-चिंचवडचे मैलायुक्त सांडपाणी थेट नदीत सोडल्याने आळंदीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटील बनला आहे, त्यासाठी इंद्रायणीचे पाणी शुद्ध केले जाईल, प्रदूषण रोखले जाईल, अशी आश्वासने देण्यात आली होती. 

आळंदीला दररोज 2 लाख लीटर पाणी दिले जाईल, असा निर्णय पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर आणि लोकप्रतिनिधींनी घेतला होता. आज 4 वर्षे होऊन गेलीत. 1 लाख लोकसंख्या असलेल्या आळंदीकराना रोज गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. शुद्ध पाण्यासाठी लोक पैसे मोजत आहेत. नळातून येणारे पाणी अंघोळ करण्याच्या लायकीचे राहिले नाही, त्यामुळे त्वचा रोग होऊ शकतात. प्रशासनाकडे शुद्धीकरणाची यंत्रणा असूनही पाणी शुद्ध का मिळत नाही, असा सवाल जेष्ठ नागरिक शामकांत भवरीया यांनी केला आहे.

भामा आसखेड प्रकल्पातून पुणे महापालिका 5 एमएलडी पाणी देईल मात्र, आळंदीचा भविष्यातील विस्ताराचा विचार करून कुरळी येथील पंपिंग स्टेशनमधून 15 एमएलडी पाणी आळंदी शहराला मिळावे, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठपुरावा सुरू करण्यात आला होता. मात्र अद्यापही आळंदीकराना शुद्ध पाणी मिळत नाही. आळंदीहून खराडी, चंदननगर, वाघोली या नव्या आयटी आणि आधुनिक वसाहतींना भामा आसखेडचे पाणी जाते, मात्र आळंदीला पाणी मिळत नाही. साडे पाच कोटी रुपयांचे नव्याने जलशुद्धीकरण बांधले. आळंदीला 250 वर्षांपासून तिर्थक्षेत्राची परंपरा आहे. येथे भाविकांसाठी पण पाणी नाही. जलपर्णी वाढली आहे. मोशीच्या पलीकडे पाण्याचा उपसा नगरपरिषद करते. हे पाणी शुद्ध होत नाही, याची कारणे शोधून रोज किमान तीन तास पाणी पुरवठा करावा, अशी मागणी नाथसंप्रदायिक मल्हारदादा काळे यांनी केली आहे.

उलटी, मळमळणे असे पोटाचे विकार लोकांना होत आहेत, तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी, मुख्याधिकारी नगर परिषद सह अन्य मान्यवरांनी बिसलेरी पाणी पिण्यासाठी वापरण्यापेक्षा आळंदी नगर परिषदेने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा फिल्टर केले असेल तर त्यांनी एक महिनाभर पाणी पिऊन दाखवावे अशी लोकप्रतिनिधींनी इच्छाशक्ती जागवून पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी नागरिकांची मागणी होत आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles