नवी दिल्ली : आसाममध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी अनुक्रमे १ एप्रिल आणि ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये प्रचार करत असून आज आसामच्या कामरूपमध्ये त्यांनी प्रचारसभा घेतली. या सभेमध्ये मोदी सरकारवर त्यांनी चौफेर टीका केली. “तुम्हाला जर खोटं ऐकायचं असेल, तर आपला टीव्ही ऑन करा आणि नरेंद्र मोदींचं तोंड बघा. ते दिवसाचे २४ तास खोटं बोलतात”, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी सीएएच्या मुद्द्यावरून देखील भाजपावर टीकास्त्र सोडलं.
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, “मी इथे तुमच्याशी खोटं बोलायला आलेलो नाही. कारण माझं नाव नरेंद्र मोदी नाही. आसामविषयी, शेतकऱ्यांविषयी किंवा इतर कोणत्याही गोष्टीविषयी तुम्हाला जर खोटं ऐकायचं असेल, तर तुम्ही टीव्ही ऑन करा आणि नरेंद्र मोदींचं तोंड बघा. ते पूर्ण २४ तास खोटं बोलतात”. “भाजपा रोजगार देण्याचा प्रयत्न करत नाही. युवकांना मदत करण्याचा प्रयत्न करत नाही. उलट आसामवर आक्रमण करते. सीएए हा कायदा आसामवरचं आक्रमणच आहे”, असं देखील राहुल गांधी म्हणाले.