Thursday, February 6, 2025

केशरी रेशनकार्ड धारकांनाही मोफत धान्य देण्याची अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची मागणी

मुंबई : मुख्यमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत एक महिन्याचे धान्य राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र त्याच सोबत ही योजना केशरी रेशन कार्ड धारकांनाही (APL) लागू व्हावी अशीही मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

संघटनेने म्हटले आहे की, रेशनकार्डे नसलेला भाड्याच्या घरात राहणारा कामगार, स्थलांतरित मजूरवर्ग राज्यात मोठ्या संख्येने आहे. त्यांना देखील आधारकार्ड किंवा तत्सम पुरावा असल्यास या मोफत धान्य योजनेत सामावून घ्यावे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या सगळ्याच कुटुंबांची उपासमार होते आहे. कोरोना रुग्णांना उपचार मिळण्यात येणाऱ्या प्रचंड अडचणी बघता अन्नही अपुरे मिळाले तर या कुटुंबांनी जगायचे कसे हा ज्वलंत प्रश्न आहे. तसेच ही योजना कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरेपर्यंत किमान तीन महिने तरी सुरू ठेवावी, तरच त्याचा उपयोग होऊ शकतो, अशीही मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने केली आहे.

तसेच जनवादी महिला संघटनेने २५ मार्च २०२१ रोजी अन्न व नागरी. पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. त्यावेळीही मोफत धान्य योजनेत केशरी कार्डधारकांचा तसेच कचरावेचक, घरकामगार, वेश्या अशा अनेक अत्यंत गरजू घटकांचा समावेश व्हावा आणि स्थलांतरित गरजूंना तात्पुरत्या शिधा पत्रिका देण्यात याव्यात अशी मागणी केली होती. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत आपल्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन सचिवांनी दिले होते. परंतु निर्णय घेतला गेलेला नाही

तसेच दिनांक २३ एप्रिल २०२१ रोजी केंद्र सरकारने देखील मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ती योजना देखील केशरी कार्डधारकांना लागू करावी, अशी केंद्र सरकारकडे मागणी करण्याची विनंती देखील करण्यात आली आहे.

या निवेदनावर अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य अध्यक्षा नसीमा शेख, राज्य सचिव प्राची हातिवलेकर, राज्य खजिनदार सुभद्रा खिलारे, राज्य उपाध्यक्ष किरण मोघे, सोन्या गिल, लहानी दौडा, हेमलता पाटील, सरस्वती भांदिगें, रेहाना शेख, शेवंता देशमुख, ताई बेंदर, मुमताज हैदर, आनंदी अवघडे, सहसचिव सरोजा स्वामी, सुनंदा बल्ला, हिराबाई घोंगे, हीना वनगा, शकुंतला पाणीभाते, सुनिता शिंगडा, सुरेखा जाधव, दुर्गा काकडे, प्रतीक्षा हाडके, रेखा देशपांडे आदींची नावे आहेत.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles