दिल्ली : ओलंपिक पदक विजेते बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि कॉमनवेल्थ पदक विजेती विनेश फोगाट यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलन सुरू आहे.कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलनास बसलेल्या पैलवानांना पाठिंबा देण्यासाठी इतर अनेक पैलवान याठिकाणी ठाण मांडून आहेत.
मात्र, येथील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये दोन पैलवान जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.दुष्यंत फोगाट आणि राहुल असं जखमी पैलवानांचं नाव आहे.महिला खेळाडूंचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांखाली भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गेल्या 11 दिवसांपासून पैलवान आंदोलनास बसले आहेत.मात्र, सिंह यांनी आपल्यावरील सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

बुधवारी रात्री विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर धक्काबुक्कीचा आरोप केला. आंदोलनास बसलेल्या पैलवानांसोबत झटापट झाल्याचं दिल्ली पोलिसांनी मान्य केलं. दिल्ली पोलिसांमधील अधिकारी प्रणव तायल यांच्या माहितीनुसार, या दरम्यान काही पोलीस कर्मचारी आणि पैलवान हे जखमी झाले आहेत.
पैलवानांनी दिल्ली पोलिसांना लेखी स्वरुपात तक्रारही दिली. दिल्लीचे पोलीस उपायुक्त रविकांत कुमार यांनी बीबीसीला सांगितलं, “सीसीटीव्ही फुटेज पाहून पैलवानांच्या आरोपांबाबत तपास केला जात आहे.”दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती कोणत्याही परवानगीशिवाय धरणे आंदोलनावर फोल्डिंग बेड आणण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी त्यांना थांबवलं. याच गोष्टीवरून वाद सुरू झाला, अशी माहिती समोर येत आहे.