Friday, March 14, 2025

पिंपरी-चिंचवडची ओळख ‘नॉलेज सिटी’ करण्याचा संकल्प ;भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची मागणी

शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाची सेंट्रल लायब्ररी उभारावी

पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर:

आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जाणा-या आपल्या स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाचन संस्कृती वृध्दींगत व्हावी व शहराचा वैचारिक विकास व्हावा यादृष्टीने महापालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. याच अनुशंगाने शहरात मध्यवर्ती ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची सेंट्रल लायब्ररी उभारण्यात यावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आगामी काळात पिंपरी-चिंचवडची ओळख ‘नॉलेज सिटी’ अशी व्हावी, असा आमचा संकल्प आहे. त्यासाठी राज्य-परराज्यातील नामांकीत शिक्षण संस्थांच्या शाखा शहरात सुरू व्हाव्यात. यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून आपण धोरणात्मक निर्णय घेत आहात, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. महापालिका प्रशासानाच्या प्रयत्नातून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, ललित कला अकादमी यासारख्या मोठ्या संस्थांच्या शाखा शहरात सुरू होत आहेत.

शहरात देशातील कानाकोपऱ्यातून लोक व्यवसाय, नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत. त्यामुळे विविध भाषिक नागरिकांचा विचार करून मराठी व इंग्रजी भाषेप्रमाणेच विविध भाषेतील विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध उपलब्ध असलेले अध्यायावत ग्रंथालय ही या शहराची गरज आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना…

वाचनासाठी ग्रंथ उपलब्धतेप्रमाणेच त्या ठिकाणी साहित्य विषयक उपक्रम साजरे करण्यासाठी प्रेक्षागृहासह रंगमंच उपलब्धता, ग्रंथ व सांस्कृतिक प्रदर्शनासाठी वैशिष्ट्यपूर्ण दालन व्यवस्था, ग्रंथरचनेचा इतिहास प्रदर्शित करण्यासाठी नाविन्यपूर्ण रचना, दिव्यांगांना ग्रंथालयात सहजपणे वावरता यावे अशा प्रकारची सुविधा, अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतील पुस्तकांची सुविधा, मोकळ्या वातावरणात हिरवळीवर वाचन करता यावे अशी व्यवस्था – अशा विविध बाबींचा विचार करुन सर्वसमावेशक आंतरराष्ट्रीय दर्जाची सेंट्रल लायब्ररी उभारण्यात यावी. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर तात्काळ कार्यवाही सुरू करावी, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles