अकोला : महाराष्ट्राच्या काही भागात सध्या अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. या वादळी पावसामुळे काही ठिकाणच्या घरांचेही नुकसान झाले आहे. रविवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील पारस परिसरातील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच मंदिराच्या शेडवर लिंबाचे मोठे झाड कोसळले. रविवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे हे झाड कोसळलं. यात 7 भाविकांचा मृत्यू झाला आहे. यात चार महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटू शकले नाही. या घटनेत 5 गंभीर जखमी तर 40 जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीने हे झाड हटवण्यात आले.
या सर्व जखमींवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच अकोल्याचे जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे त्यासह शोध बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं होते.
मृतांमध्ये अतुल आसरे (वय ३२ वर्ष, बाभूळगाव जि. अकोला), विश्वनाथ तायडे (वय ३५ वर्ष, सोनखेड), पार्वताबाई महादेव सुशील (वय ६५ वर्ष आलेगाव बाजार), भास्कर आंबीलकर (वय ६० वर्ष अकोला), उमा महेंद्र खारोडे (वय ५० वर्ष, भुसावळ) अशी मृत व्यक्तींची नावं असून काहींचे अद्याप नावे कळू शकले नाहीत. तरीही यातील मृतकांची अद्याप पर्यंत ओळख पटली नसून दोन्ही पुरुष असून त्यांची वय ३५ आणि ४५ अशी आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी जखमी भाविकांना बाहेर काढून उपचारार्थ रुग्णालयात रवाना केले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. बाळापूर पोलिस घटनास्थळी पोहोचले असून, बचावाचे कार्य सुरू आहेत.
या घटनेतील मृत व्यक्तीच्या नातेवाईकांसाठी रु ४ लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. तर 40 ते 60 टक्के अपंगत्व आलेल्या व्यक्तींना 74000/- मदत देण्यात येणार आहे. 60 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व आलेल्या व्यक्तींना 2 लक्ष 50 हजार मदत देण्यात येणार आहे. एक आठवड्यापेक्षा जास्त रुग्णालयात असल्यास 16000/- मदत देय आहे. एक आठवड्यापेक्षा कमी रुग्णालयात असल्यास 5400/- मदत देय आहे.