पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.२५-महाराष्ट्राची पारंपरिक लावणी कला पुनर्जीवित करण्यासाठी आमदार उमा खापरे आणि महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय लावणी महोत्सवाला शनिवारी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सुरुवात झाली. प्रसिद्ध कथक नर्तक व संगीत नाट्यपूरस्कार विजेते डॉ.पंडित नंदकिशोर कपोते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि नटराजाची पूजा करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
पिंपरी चिंचवड शहरात १४ वर्षांनी राज्यस्तरीय लावणी स्पर्धा व लावणी महोत्सवाचे आयोजन आमदार उमा खापरे,आमदार अश्विनी जगताप व माजी विरोधीपक्ष नेत्या सुलभा उबाळे यांनी केले आहे.
‘आजच्या काळात लावणीचे रूप बदलले आहे.ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेली महत्वाची पारंपरिक लावणी कला जोपासण्यासाठी लावणी स्पर्धा व लावणी महोत्सव आयोजित केला आहे,असे आमदार उमा खापरे यांनी उदघाटन प्रसंगी सांगितले.
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर या स्पर्धेच्या परीक्षक आहेत.
मेघा घाडगे,दीप्ती आहेर,रजनी पाटील पुणेकर,सोनाली जळगावकर,श्रृती मुंबईकर,उर्मिला मुंबईकर या लावणी कलाकारांनी विविध सुप्रसिद्ध गाण्यावर दिलखेचक लावणी नृत्ये सादर केली.पिंपरी चिंचवड शहरातील महिलांनी महोत्सवाचा आनंद लुटला.आज बक्षीस वितरण रविवारी (ता. २६) सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहीर यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.